कोरोनामुळे गणेशोत्सवाच्या वर्गणीला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:18 IST2021-09-04T04:18:42+5:302021-09-04T04:18:42+5:30
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे मुख्यालयात गणेश मंडळांची बैठक न बोलवता सहा विभागातील विभागीय कार्यालयात बेालवण्यात आली. ...

कोरोनामुळे गणेशोत्सवाच्या वर्गणीला फटका
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे मुख्यालयात गणेश मंडळांची बैठक न बोलवता सहा विभागातील विभागीय कार्यालयात बेालवण्यात आली. यावेळी गणेश मंडळांनी विविध अडचणी मांडल्या आहेत. शहरात सुमारे पाचशे मंडळे उत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी मंडळांनी तयारी केली आहे; मात्र उत्सव साजरा करण्यासाठी त्या प्रमाणात वर्गणीच मिळत नसल्याने मंडळांची अडचण झाली आहे.
महापालिकेने उत्सवाची तयारी करताना कोरोनाचा संकटकाळ बघता गर्दी होऊ नये, तसेच पर्यावरणस्नेही उत्सव व्हावा, यासाठी मिशन विघ्नहर्ता मोहीम राबवण्याची तयारी केली आहे. त्याच बरोबर राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तयार केलेले नियमदेखील कटाक्षाने पाळण्यात येणार आहेत. त्यासाठी मंडप उभारणीची परवानगी आवश्यक आहे. त्यासाठी प्रतिमंडळ ८८६ रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे, तसेच मंडळाच्या ठिकाणी जाहिरातीच्या प्रती फलक व बोर्डासाठी ७५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. कोरोनामुळे मुळातच वर्गणी मिळत नसल्याने जाहिरातदार प्रायोजक शोधण्यात आले आहे. त्यावरही शुल्क भरावे लागणार असल्याने मंडळांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळेच यंदा मंडप शुल्क आणि जाहिरात शुल्क माफ करावे, अशी मागणी मंडळांनी केली आहे. नाशिक पूर्व- पश्चिम, सिडको, सातपूर, नाशिकरोड आणि पंचवटी यासर्वच भागात अशा प्रकारच्या मागण्या करण्यात आल्यानंतर विभागीय अधिकाऱ्यांनी बैठकीत आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवण्याचे आश्वासन दिले हेाते. त्यानुसार प्रस्ताव पाठवण्यात आला; मात्र आयुक्तांनी तो नाकारला आहे.
इन्फो...
गणेशोत्सवासाठी मंडप आणि जाहिरात शुल्कात सवलत देण्यास महापालिका आयुक्तांनी नकार दिला असला तरी सहाही विभागात एक खिडकी योजना राबवण्याचे निर्देश मात्र दिले आहेत. याशिवाय उच्च न्यायालयात महेश बेडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकेचा संदर्भ लक्षात घेता गणेशोत्सव काळात मंडप उभारणीची प्रक्रिया, परवानगीकरिता सर्वसाधारण निकष, कमान उभारणीचे निकष, ध्वनी प्रदूषण आणि तक्रार निवारणासाठी व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.
इन्फो...
गणेशोत्सवासाठी असे आहेत महापालिकेचे नियम
- सार्वजनिक उत्सवासाठी मूर्तीची उंची चार फूटच असावी.
- मूर्ती शाडू मातीच्याच असाव्यात
- परवानगीशिवाय मंडप उभारण्यास मनाई
- किमान सात दिवस अगोदर मंडपाची परवानगी आवश्यक
- मंडप उभारण्यासाठी खड्डे करण्यास मनाई
- विना परवानगी मंडप उभारल्यास गुन्हे दाखल होणार