कोरोनामुळे जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:17 IST2021-08-23T04:17:00+5:302021-08-23T04:17:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदूरशिंगोटे : दोन वर्षांपासून कोरोना आजाराने धुमाकूळ घातल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. याचा ...

कोरोनामुळे जिल्हा परिषद शाळांना ‘अच्छे दिन’
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरशिंगोटे : दोन वर्षांपासून कोरोना आजाराने धुमाकूळ घातल्याने सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. याचा परिणाम इंग्रजी व खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर झाला असून त्यांची पन्नास टक्के विद्यार्थी संख्या घटली आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांना अच्छे दिन आले असून ग्रामीण भागातील बहुतांश पालक इंग्रजी व खासगी शाळेतून मुलांना काढून जिल्हा परिषद शाळेत प्रवेश देत आहेत.
मागील दीड ते दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने जगावर संकट कोसळले आहे. ही महामारी रोखण्यासाठी शासनाने केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरिबांचे रोजगार बुडाले. तसेच मध्यमवर्गीय नागरिकही मेटाकुटीला आले असून संसाराची घडी विस्कटली आहे. कोरोनापूर्वी अनेक पालकांनी पदरमोड करीत आपले पाल्य इंग्रजी शाळांमध्ये टाकले होते. किंबहुना ग्रामीण भागात याचे लोणच पसरले होते. यामुळे जि.प. शाळांना अवकळा यायला सुरुवात झाली होती. मात्र, कोरोनामुळे हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार व उद्योगधंदे बुडाल्याने स्वतःचे घर चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यात पाल्यांची इंग्रजी शाळेची फी भरणे अवघड जात असल्याने अनेक नागरिक जिल्हा परिषद शाळेत मुलांचा प्रवेश घेत आहेत.
नांदूरशिंगोटे परिसरात तसेच सिन्नर व संगमनेर तालुक्यात इंग्रजी शाळा आहेत. या शाळांमध्ये अगोदर पालक आपल्या पाल्यांना प्रवेश घेण्यासाठी गर्दी करीत असत. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना अवकळा आली होती. मात्र, कोरोनानंतर परिस्थिती पालटली असून पालक आता जिल्हा परिषद शाळांकडे झुकू लागले आहेत. तसेच अनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी आपला गाशा गुंडाळला आहे. यामुळे परिसरातील इंग्रजी शाळांमधील ५० टक्के प्रवेश कमी झाले असून जिल्हा परिषद शाळांमध्ये वाढले असल्याचे चित्र आहे.
कोट...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रूक केंद्रांतर्गत १३ जिल्हा परिषद शाळा आहेत. दरवर्षीपेक्षा या वर्षी या सर्वच शाळांमध्ये पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश घेत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनामुळे अनेक खासगी शाळा अद्यापही बंद असून, सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळांकडे पालकांचा कल वाढला आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून १८ ते २० विद्यार्थी मराठी शाळेत दाखल झाले आहेत.
- सुधीर दिघे, केंद्रप्रमुख, दोडी बुद्रूक