कोरोनामुळे ‘ब्रेथ ॲनालायझर’ धूळ खात अन् मद्यपी सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:14 IST2021-02-12T04:14:26+5:302021-02-12T04:14:26+5:30
--- नाशिक : शहर वाहतूक शाखा व विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने शहरात नाकाबंदीदरम्यान मद्यप्राशन केलेले वाहनचालक ओळखण्याकरिता कर्तव्यावर असणाऱ्या ...

कोरोनामुळे ‘ब्रेथ ॲनालायझर’ धूळ खात अन् मद्यपी सुसाट
---
नाशिक : शहर वाहतूक शाखा व विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने शहरात नाकाबंदीदरम्यान मद्यप्राशन केलेले वाहनचालक ओळखण्याकरिता कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांकडून वेळोवेळी ‘ब्रेथ ॲनालायझर’ यंत्राचा वापर यापूर्वी केला जात होता; मात्र मागील वर्षी कोरोनाने ‘एन्ट्री’ करताच हा वापर थांबला अन् मद्यपी वाहनचालक ओळखायचे तरी कसे, असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला. पोलीस आयुक्तालयाकडील एकूण ९५ ब्रेथ ॲनालायझर वर्षभरापासून धूळ खात पडले असून, मद्यधुंद वाहनचालक मात्र रस्त्यावर सुसाट असल्याचे चित्र आहे.
कोरोनाचे संकट मागील वर्षी फेब्रुवारीअखेर देशाच्या उंबरठ्यावर येऊन धडकले आणि नाशकात कोरोनाचा शिरकाव मार्चअखेर झाला. तेव्हापासून आतापर्यंत ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यावर निर्बंध आले. कारण ‘ब्रेथ ॲनालायझर’ हे यंत्र प्रत्येक वाहनचालकाच्या तोंंडात देऊन त्याद्वारे मद्यप्राशन केल्याच उलगडा होतो. देशात २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आणि रस्त्यांवरील वाहने एकाएक सलग चार महिने अचानकपणे गायबच झाली. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनेच रस्त्यावर धावताना दिसत होती. यामुळे या काळात ब्रेथ ॲनालायझरचा फारसा वापर करण्याची गरज पोलिसांना भासली नाही.
थर्टिफर्स्टच्या अनुषंगाने पूर्वसंध्येला पोलिसांकडून शहरात ३० ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती; मात्र या नाकाबंदीत पोलिसांना एकही मद्यपी वाहनचालक रस्त्यांवर मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविताना आढळून आला नव्हता. यावेळीही ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्यात आलेला नव्हता. कोरोनामुळे अद्यापही ब्रेथ ॲनालायझरच्या वापरास पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळालेली नाही. शहर वाहतूक शाखेकडे एकूण ६९ तर प्रत्येक पोलीस ठाण्याकडे दोन याप्रमाणे एकूण २६ ब्रेथ ॲनालायझर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
--- इन्फो ---
मार्चनंतर कोणीही मद्यप्राशन केले नाही?
गेल्यावर्षी कोरोना आला आणि मार्चपासून लॉकडाऊन झाले. मार्च महिन्यापासून तर डिसेंबरअेखरपर्यंत शहरात केवळ १४ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. मार्चमध्ये नऊ, तर त्यानंतर मे महिन्यात १ आणि जुलै महिन्यात दोन अशा कारवाया करण्यात आल्या आहेत. जुलैनंतर शहरात २०२० साली अखेरचे सहा महिने एकाही व्यक्तीने मद्यप्राशन करत वाहन चालविले नाही हे विशेष!
---इन्फो---
रांगा लावून केली होती मद्य खरेदी
अनलॉकची प्रक्रिया सुरू होण्याअगोदरच शहरात मद्यविक्रीची दुकाने खुली करण्यात आली होती. विविध अटी, शर्थींचे बंधने घालत मद्यविक्री सुरू झाली होती. मद्यपींनी रांगा लावून दामदुप्पट दरानेही मद्य खरेदी करत हौस भागविली होती. कोरोनाकाळात मद्याचा विक्रमी खप झाला होता. रेशन दुकानांप्रमाणेच मद्यविक्रीच्या दुकानांपुढेही लांबच लांब रांगा पहावयास मिळाल्या होत्या.
---कोट---
कोरोना प्रादुर्भावाची भीती असल्याने ब्रेथ ॲनालायझरचा वापर करण्याचे कटाक्षाने टाळत आहे; मात्र मद्यपी वाहनचालकांना सूट मिळते असे नाही तर वाहतूक पोलीस आपल्या कौशल्य व अनुभवाच्या जोरावर मद्यपी वाहनचालकांना हेरून कारवाई करत आहेत. ब्रेथ ॲनालायझरचा वापर सध्या तरी सुरू करण्यात आलेला नाही. पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर ते पुन्हा वापरात आणले जातील.
- पौर्णिमा चौगुले-श्रींगी, उपायुक्त
फोटो आरवर ११ड्रंक१/
डमी चा फॉरमेट ११ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह नावाने सेव्ह आहे.