कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरांत वाढली चारचाकी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST2021-07-27T04:15:05+5:302021-07-27T04:15:05+5:30
नाशिक : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे प्रवासी वाहतूक कमी वापरली जाऊ लागली आहे. अनेकांनी व्यावसायिक व नोकरीनिमित्त तसेच खासगी प्रवासासाठी ...

कोरोनामुळे प्रवासी वाहतुकीला ब्रेक; घराघरांत वाढली चारचाकी !
नाशिक : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे प्रवासी वाहतूक कमी वापरली जाऊ लागली आहे. अनेकांनी व्यावसायिक व नोकरीनिमित्त तसेच खासगी प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय टाळण्याच्या उद्देशाने स्वत:ची दुचाकी अथवा चारचाकी वाहन खरेदीला कोरोनाकाळात प्राधान्य दिले आहे. त्यामुळे स्वत:ची दुचाकी किंवा चारचाकीतून प्रवास करण्याकडेच सर्वांचा कल दिसून येत असून, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांची विक्री वाढली आहे. नागरिक आपल्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आर्थिक तरतूद करून आपल्या स्वत:च्या मालकीची चारचाकी खरेदी करण्यास पसंती देत आहे.
१) दुचाकी-चारचाकी विक्री वाढली
वर्ष - - दुचाकी - चारचाकी
२०१९ - ७३,३०० - १२,९००
२०२० - ४९,००० - १२,२००
२०२१ (जुलैपर्यंत)-८,३०० -३,१५०
२) ऑटो-टॅक्सी कारची विक्री घटली
वर्ष - ऑटो - टॅक्सीकार
२०१९ - ३,००० - २५०
२०२० - ७५० - ५०
२०२१ (जुलैपर्यंत) -१०० - २०
ऑटोचालक-टॅक्सीचालक परेशान
दुचाकी, चारचाकी वाढल्याने प्रवाशांची संख्या कमी झाली असून, त्याचा थेट परिणाम व्यवसायावर झाला आहे. पूर्वी दिवसात होणाऱ्या कमाईच्या ५० टक्केही धंदा होत नाही. त्यामुळे या व्यवसायातून बाहेर पडण्याचा विचार करीत आहे.
-प्रकाश जाधव, रिक्षाचालक
--
पूर्वी रेल्वे स्टेशन, बस स्टॉप अशा ठिकाणी चांगले प्रवासी असायचे. परंतु, आता या ठिकाणीही कुटुंबातील व्यक्ती दुचाकीने सोडायला-घ्यायला येते. त्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या महागाईनंतर शिल्लक ठेवणेही कठीण झाले आहे.
-संदीप बोराडे, रिक्षाचालक
म्हणून घेतली चारचाकी
घरात दोन दुचाकी होत्या. परंतु कुटुंबाला एकत्रित बाहेर प्रवास करायचा तर अडचण होत होती. टॅक्सी अथवा रिक्षाने प्रवास करण्यास कोरोना संसर्गाची भीती वाटत होती. शेवटी स्वत:ची फोरव्हीलर घेऊन टाकली.
- विशाल कदम, व्यावसायिक
कामानिमित्त रोज घराबाहेर पडावे लागते. त्यासाठी रिक्षा, टॅक्सी अथवा बसने प्रवास करायचा म्हटले तर विनाकारण अधिक लोकांच्या संपर्कात येऊन आपल्यासोबतच कुटुंबालाही आपण संकटात टाकू, अशी भीती वाटत होती. अखेर स्वत:ची चारचाकी विकत घेतली.
- विलास पवार, व्यावसायिक