डाक कार्यालयात कोअर बॅँकिंग सुविधा
By Admin | Updated: October 13, 2015 22:33 IST2015-10-13T22:33:17+5:302015-10-13T22:33:54+5:30
सिन्नर : सुमारे दोन लाख खातेदारांना आॅनलाइनचा होणार फायदा

डाक कार्यालयात कोअर बॅँकिंग सुविधा
वावी : सिन्नर तालुक्यातील सर्व उपडाक कार्यालयांत कोअर बॅँकिंग प्रणाली कार्यान्वित झाली असून, तालुक्यातील सुमारे दोन लाख खातेदारांना आॅनलाइन सुविधेचा फायदा होणार आहे.
तालुक्यातील वावी येथे नुकताच कोअर बॅँकिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. नाशिकरोड दक्षिण डाक विभागाचे सहायक अधीक्षक अजित सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात सिन्नर पंचायत समितीच्या सभापती संगीता काटे यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. उपसरपंच विजय काटे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत कर्पे, सब पोस्टमास्तर जे. डी. अहिरे, संगणक प्रशासक सुभाष जावडे, मेल ओव्हरसिअर एस. एन. लोखंडे आदिंसह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कोअर बॅँकिंग सुविधेमुळे वावी डाक कार्यालयात खाते असणाऱ्या ग्राहकांना देशात कोठेही पैसे पाठविता किंवा काढता येणार आहेत. यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही. जगातील प्रमुख बॅँका ज्या फिनॅकल तंत्रज्ञानाचा वापर करतात या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय डाक विभागाने सदर सेवा सुरू केली आहे. त्यामुळे पोस्ट आॅफिसमधील विविध योजनेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन सहायक अधीक्षक अजित सोनार, सब पोस्टमास्तर जे. डी. अहिरे, यांनी केले आहे. डाक विभागाची ग्रामीण डाक जीवन विमा योजना व नव्याने सुरू करण्यात आलेली सुकन्या समृद्धी योजना याचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन सोनार यांनी यावेळी केले.
वावी डाक कार्यालयात सुमारे २२ हजार खातेदार असून, त्यांना कोअर बॅँकिंग सुविधेचा फायदा मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. वावीसह तालुक्यातील सिन्नर, मुसळगाव, माळेगाव, नांदूरशिंगोटे या डाक कार्यालयांत कोअर बॅँकिंग प्रणाली कार्यरत झाली असून, सुमारे दोन लाख ग्राहक या सुविधेला जोडले गेले आहेत.
कोअर बॅँकिंग प्रणालीच्या उद्घाटन कार्यक्रमास सेवानिवृत्त प्राचार्य भानुदास भेंडाळे, दिलीप वेलजाळी, बाळासाहेब शिंदे, किरण वर्पे, प्रशांत मांडवगणे, भगवान विधाते, सुधाकर कुलकर्णी, गणेश आनप यांच्यासह ग्रामस्थ व खातेदार उपस्थित होते. शैलेश कर्पे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. (वार्ताहर)