‘पदवीधर’मध्ये तांबे यांची हॅट्ट्रिक
By Admin | Updated: February 7, 2017 01:53 IST2017-02-07T01:51:34+5:302017-02-07T01:53:43+5:30
‘पदवीधर’मध्ये तांबे यांची हॅट्ट्रिक

‘पदवीधर’मध्ये तांबे यांची हॅट्ट्रिक
नाशिक : पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाची आकडेवारी पाहता यंदाची निवडणूक एकतर्फीच झाल्याचे दिसून आले असून, डॉ. सुधीर तांबे यांनी ४२ हजारांहून अधिक मतांची आघाडी घेत विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे. प्रा. ना. स. फरांदे यांच्यानंतर हॅट्ट्रिक साधणारे डॉ. तांबे पहिलेच उमेदवार ठरले आहेत. तब्बल अकरा तासांहून अधिक काळ उत्सुकता शिगेला पोहोचविणाऱ्या विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत १,४३,८७६ मतांची मोजणी करण्यात आली. त्यामध्ये कॉँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुधीर तांबे यांनी ४२,८२५ मतांनी विजय मिळविला. तांबे यांना ८३,३११, तर प्रतिस्पर्धी भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील यांना ४०,४८६ मते मिळाली आहेत. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या मतमोजणीतून बाहेर येणारा मतदारांचा कौल लक्षात घेता पदवीधर मतदारसंघावर डॉ.सुधीर तांबे यांच्या रूपाने कॉँग्रेस आपली पकड मजबूत राखून आहे. पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान घेण्यात आले असता, विभागातील ५४.३८ टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला होता. सोमवारी सकाळी आठ वाजता अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअरहाऊसिंग येथे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉ. एकनाथ डवले यांच्या उपस्थितीत ३० टेबलांवर मतमोजणीस सुरुवात करण्यात आली. साधारणत: प्रारंभीचे सात तास फक्त ४११ मतपेट्यांमधील मतपत्रिकांची खात्री करण्यात आली. मतदान केंद्रावर झालेले मतदान व प्रत्यक्ष मतपेटीत प्राप्त पत्रिकांची पडताळणी केल्यानंतर प्रत्येकी ५० मतपत्रिकांचे गठ्ठे करण्यात आले, त्यासाठी दुपारचे तीन वाजले. त्यानंतर मात्र प्रत्यक्ष प्रत्येक टेबलावर प्रत्येकी एक हजार मतपत्रिकांच्या मोजणीला सुरुवात करण्यात आली. अर्थात ही मोजणी करताना त्यातील अवैध मतपत्रिका बाजूला काढण्यात आल्या. तत्पूर्वी सकाळी दहा वाजेच्या सुमारास कॉँग्रेस आघाडीचे डॉ. सुधीर तांबे, भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील व तिसऱ्या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांच्यासह अपक्ष उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह मतमोजणी केंद्राला हजेरी लावली. परंतु मतमोजणीची एकूणच पद्धत पाहता संथगतीने एकेक प्रक्रिया पार पडत असल्याने काही काळ थांबल्यानंतर या उमेदवारांनीही तेथून काढता पाय घेतला. दुपारी तीन वाजेनंतर प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होऊन चार तासांनी म्हणजेच रात्री सात वाजेच्या दरम्यान पहिल्या फेरीची मोजणी पूर्ण झाली.
पहिल्या फेरीत मोजलेल्या ३० हजार मतांमध्ये डॉ. सुधीर तांबे यांना पहिल्या पसंतीची १७,७१७ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी भाजपाचे डॉ. प्रशांत पाटील यांना ८०५० मते मिळाली. तिसऱ्या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांना ३८७ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पहिल्या फेरीच्या निकालानंतर कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करीत, डॉ. तांबे झिंदाबादचे नारे लगावले, तसेच जोरदार फटाक्याची आतषबाजी केली. पहिल्या फेरीत ३०७३ तर दुसऱ्या फेरीत ६७९१इतकी मते बाद ठरविण्यात आली.
बाद मतांचे प्रमाण अधिक
पदवीधर मतदारसंघासाठी आपल्या पसंतीच्या उमेदवाराला पहिल्या क्रमांकाचे, तर अन्य उमेदवारांना पर्याय म्हणून दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे मत नोंदविण्याची तरतूद असतानाही प्रत्यक्ष मतमोजणीत अनेकांनी चुकीच्या पद्धतीने मतदान करून आपले मत बाद करवून घेतले. काही मतदारांनी पहिल्या पसंतीचे मतच नोंदविले नाही, तर काहींनी तिसऱ्या, चौथ्या क्रमांकापासून पुढे मते नोंदविली. मतपत्रिकेवर कोणतीही खाडाखोड, नाव अथवा चिन्ह लिहू नये, अशा सूचना असतानाही काहींनी मत नोंदविताना पत्रिकेवर आपले नाव, स्वाक्षरी केली. त्यामुळे पहिल्या फेरीत मोजण्यात आलेल्या ३० हजार मतांपैकी ३०७३ मते बाद ठरविण्यात आल्याने हे प्रमाण १०.२४ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. प्रत्येक फेरीत बाद मतांचे प्रमाण अशाच प्रकारे असल्याने मतदार पदवीधर असूनही अशिक्षित असल्याची टिप्पणी मतमोजणी कर्मचाऱ्यांनी केली.