नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा रौप्यमहोत्सवी अर्थात २५वा पदवीदान समारंभ शुक्रवारी ( दि.१२) होणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. नागेश्वर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या हा सोहळा पार पडणार आहे.मुक्त विद्यापीठातर्फे यावर्षी सुमारे १ लाख ४८ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार असून, यातील सुमारे एक ते दीड हजार विद्यार्थी पदवीदान सोहळ्यात उपस्थित राहणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन व कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली आहे. मुक्त विद्यापीठाचा यंदाचा रौप्यमहोत्सवी पदवीदान समारंभ असून, विद्यापीठातील आठ विद्याशाखा व राज्यभरातील आठ विभागीय केंद्रे आणि एक हजार ८७४ अभ्यासकेंद्रांमार्फ त विद्यापीठातर्फे राज्यभरात ज्ञानदानाचे कार्य सुरू आहे. यंदा विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांसाठी सहा लाख १५ हजारांहून अधिक विद्यार्थी प्रविष्ट असून, पीएच.डी, एम.फील, पदव्युत्तर पदवी, पदवी व पदविका अशा विविध प्रकारच्या जवळपास १३८ अभ्यासक्रमांच्या एक लाख ४८ हजार २६० विद्यार्थ्यांना यंदा या समारंभात पदवी प्रदान केली जाणार आहे. या सोहळ्याची विद्यापीठ प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे.
मुक्त विद्यापीठाचा दीक्षान्त सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:13 IST