विद्यमानांनी आरक्षणाप्रमाणे केली सोय

By Admin | Updated: February 15, 2017 00:52 IST2017-02-15T00:52:33+5:302017-02-15T00:52:46+5:30

अनेकांना फटका : पतीच्या जागी पत्नीची, तर पत्नीच्या जागी पतीची उमेदवारी; नव्या गट-गणांमुळे अनेकांचा लागणार कस

Convenience is done by the existing reservation | विद्यमानांनी आरक्षणाप्रमाणे केली सोय

विद्यमानांनी आरक्षणाप्रमाणे केली सोय

नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत गट आणि गणांचे आरक्षण बदलल्यामुळे अनेक विद्यमान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना याचा फटका बसला आहे. काहींनी मात्र आरक्षणाप्रमाणे आपल्या गट- गणांची सोय करून घेतली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.  काही ठिकाणी विद्यमान महिला सदस्यांच्या जागी त्यांच्या पतीने, तर काही ठिकाणी पतीच्या जागी पत्नीने उमेदवारी केल्याचे चित्र माघारीनंतर स्पष्ट झाले. यामुळे काही ठिकाणी चुरशीच्या लढती पहावयास मिळत आहे. अनेक उमेदवारांना यावेळी थांबावे लागले आहे. काहींनी पुन्हा नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला आहे.
येवला तालुक्यात मुखेड गटाचे विद्यमान सदस्य बाळासाहेब गुंड यांनी याच गटातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर पत्नी कुसूम गुंड यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. पाटोदा गणातील शकुंतला कोंढरे यांचे पती भास्कर कोंढरे शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात आहेत. राजापूर गटाचे राष्ट्रवादीचे विद्यमान सदस्य प्रवीण गायकवाड यांनी गणात उमेदवारी करणे पसंत केले असून, शिवसेनेच्या तिकिटावर नागडे गणात ते लढत देत आहेत. नगरसूल गणाच्या भारती सोनवणे यांनी नागडे गणात आपला मोर्चा वळविला असून, त्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत. चिंचोडी गणातील राष्ट्रवादीच्या विद्यमान सदस्य शिवांगी पवार या याच गणातून पुन्हा निवडणुकी रिंगणात आहेत.  कळवण तालुक्यात विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व माजी अध्यक्ष जयश्री पवार, नितीन पवार व भारती पवार निवडणूक रिंगणात आहेत. भारती पवार गेल्या पंचवार्षिकमध्ये देवळा तालुक्यातील उमराणा गटाचे प्रतिनिधित्व करत होत्या. आरक्षण बदलामुळे त्यांनी मानूर गटातून अर्ज भरला आहे.  देवळा तालुक्यात विद्यमान सदस्य लीना अहेर यांनी यावेळी लोहोणेर गटातून उमेदवारी केली आहे. यापूर्वी त्या देवळा गणाचे नेतृत्व करत होत्या. वाखारी गणात भाजपाच्या विद्यमान सदस्य सिंधूबाई पवार यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे पवार यांनी सभापतिपदही भूषविले आहे.  सुरगाणा तालुक्यात आमदार पुत्र इंद्रजीत गावित यांना आरक्षणामुळे आपला गण बदलावा लागला असून, भवडा गणातुन आता ते भदर गणात माकपतर्फे उमेदवारी करीत आहेत, तर हट्टी गटाच्या विद्यमान सदस्य मंदाकिनी भोये या भदर गणात माकपतर्फे निवडणूक लढवित आहेत. गोंदूणे गणाच्या सदस्य विजया घांगळे यांना आरक्षणाचा फटका बसला असून, त्यांचे पती या गणातून माकपच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेचे विद्यमान उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्या पत्नी गोंदुणे गटातून राष्ट्रवादीकडून लढत आहेत. दिंडोरी तालुक्यातील सभापती अलका चौधरी या राष्ट्रवादीच्या सदस्य शिवसेनेच्या पाठिंब्याने सभापती झाल्या. निवडणुकीपूर्वी त्यांनी कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला; मात्र कॉँग्रेसने तिकीट नाकारल्याने अहिवंतवाडी गणातून त्या अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत. विद्यमान सभापती भास्कर भगरे यांनी मडकीजाम गणातून खेडगाव गटात उडी घेतली असून, राष्ट्रवादीच्या तिकिटावर ते या गटात नशीब आजमावत आहेत.
सिन्नर तालुक्यातील नायगाव गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुन बर्डे यांनी पंचायत समिती सभापतिपदाचे आरक्षण बघून आपला मोर्चा गणात वळविला असून, आता ते माळेगाव गणातून राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात आहेत, तर विद्यमान पंचायत समिती सदस्य बाळासाहेब वाघ यांनी गणातून गटात उडी घेत उमेदवारी केली आहे. चास गणातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विद्यमान सदस्य उदय सांगळे यांनी यावेळी चास गटातून शिवसेनेच्या तिकिटावर पत्नी शीतल सांगळे यांना उभे केले आहे, तर माणिकराव कोकाटे समर्थक विद्यमान सदस्य संगीता काटे यांचे पती विजय काटे अपक्ष निवडणूक रिंगणात आहेत.
पेठ तालुक्यात गटांची अदला-बदल झाल्याने विद्यमान सदस्य भास्कर गावित हे धोंडमाळ गटातून, तर त्यांच्या स्रुषा हेमलता गावित या कोहोर गटातून शिवसेनेच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. मालेगाव तालुक्यात सभापती अनिता अहिरे यांचे पती दीपक अहिरे राष्ट्रवादीकडून निमगाव गटातून रिंगणात आहेत. नांदगाव तालुक्यात साकोरा गटाच्या माधुरी बोरसे याच गणातून अपक्ष उमेदवारी करीत आहेत. सटाणा तालुक्यात वीरगाव गटाचे विद्यमान सदस्य प्रा. अनिल पाटील यांच्या पत्नी सारिका पाटील ठेंगोडा गटातून उमेदवारी करीत आहेत. पठावे दिगर गट खुला झाल्याने येथे सिंधूताई सोनवणे यांचे पती संजय सोनवणे उमेदवारी करीत आहेत. नामपूर गटाच्या सुनीता पाटील यांचे पती सी. एन. पाटील जायखेडा गटातून रिंगणात आहेत.

Web Title: Convenience is done by the existing reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.