निवडणुकांमध्येही युतीत संघर्ष?

By Admin | Updated: November 16, 2015 22:16 IST2015-11-16T22:16:02+5:302015-11-16T22:16:39+5:30

नगरपंचायत : नगराध्यक्ष निवडणुकीसाठी ‘फोडा-फोडीचे’ राजकारण

Controversy in the elections? | निवडणुकांमध्येही युतीत संघर्ष?

निवडणुकांमध्येही युतीत संघर्ष?

नाशिक : राज्य सरकारमध्ये भाजपा आणि शिवसेना यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच नुकत्याच झालेल्या नगरपंचायत व नगर परिषद निवडणुकांच्या नगराध्यक्ष पदासाठीही दोन्ही पक्षांमध्ये छुपा संघर्ष सुरू झाल्याचे वृत्त आहे.
जिल्ह्णातील सहा नगरपंचायत / नगर परिषद निवडणुकांच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकांमध्ये त्याची प्रचिती येण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात भाजपा-शिवसेनेने नगरपंचायत निवडणुकांमध्ये स्वतंत्रपणे उमदेवार उभे केले होते. निफाडला मात्र भाजपा-शिवसेनेची युती होती. युतीच्या वतीने पॅनल तयार करून नगरपंचायत निवडणूक लढविली गेली. मात्र भाजपा-शिवसेनेला समसमान पाच पाच जागा मिळविल्यानंतर नगराध्यक्ष पदावरून दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेच्या वतीने अपक्ष म्हणून निवडून आलेले किरण कापसे यांना गळाला लावत शिवसेनेत प्रवेश करून घेतला, तर भाजपानेही अन्य पक्षांतील पदाधिकारी व अपक्ष नगरसेवक श्रीमती गाजरे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा ठेवून शिवसेनेला ‘हम भी कुछ कम नही’चे आव्हान दिले. त्यातच निफाडचे आमदार अनिल कदम यांनी किरण कापसे यांच्या पक्ष प्रवेशानंतर निफाडला सेनेचाच नगराध्यक्ष होणार असे जाहीर वक्तव्य केल्याने भाजपाच्या गोटात खळबळ उडाल्याचे चित्र आहे.
सुरगाणा येथेही भाजपाच्या सर्वाधिक जागा निवडून आलेल्या असल्या तरी अपक्षांच्या जोडीने आणि प्रसंगी माकपची मदत घेऊन सेनेचा नगराध्यक्ष करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. देवळा नगरपंचायतीत तर पक्षीय चिन्हे बाजूला ठेवून शहर विकास आघाडीच्या वतीने भाजपाच्या नेत्यांनी निवडणूक लढविण्याची शक्कल लढविल्याचे चित्र होते. त्यामुळे देवळ्याला नगराध्यक्ष शहर विकास आघाडीच्या उमेदवार धनश्री अहेर या अपक्ष नगरसेवक होणार असल्याचे चित्र आहे.
पेठ नगरपंचायतीत तर शिवसेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले असल्याने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष सेनेचाच होणार असल्याने भाजपाला धोबीपछाड मिळणार असल्याचे बोलले जाते. चांंदवडला भाजपा व सेनेने स्वतंत्ररीत्या निवडणूक लढविली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीपासून भाजपाचे डॉ. आत्माराम कुंभार्डे आणि सेनेचे नितीन अहेर एकत्र असल्याने येथे युती होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Controversy in the elections?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.