सागरानंदांकडून दिलेल्या पदव्या वादात
By Admin | Updated: September 15, 2015 22:33 IST2015-09-15T22:32:06+5:302015-09-15T22:33:07+5:30
सागरानंदांकडून दिलेल्या पदव्या वादात

सागरानंदांकडून दिलेल्या पदव्या वादात
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरच्या श्री आनंद पंचायती आखाड्याच्या नावावर स्वामी सागरानंद सरस्वती व स्वामी शंकरानंद सरस्वती यांनी आतापर्यंत जवळपास पाच पदव्या दिलेल्या आहेत. त्या पदव्यांशी श्री पंचायती आनंद आखाड्याचा काही संबंध नसून आनंद आखाड्याचे रमता पंच यांनी त्या पदव्यांना आक्षेप घेतला आहे. ज्या साधूंना अशा पदव्या दिल्या आहेत, त्यांना रमता पंच वतीने निष्कासित करण्यात येत आहे, अशा आशयाचे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, आनंद आखाड्याच्या नावाने स्वामी सागरानंद सरस्वती व स्वामी शंकरानंद सरस्वती धर्माचार्यसारख्या पदव्या बहाल करीत आहे. यासंदर्भात आनंद आखाड्याच्या रमता पंचने सागरानंद महाराज यांना विचारणा केली असता सागरानंद यांनी सदर पदव्या या आखाड्याच्या नावावर दिल्या नसून आश्रमाच्या नावावर दिल्या आहेत. गुरुकुलाच्या नावाने संबंधीतांना धर्माचार्य बनविल्याचा खुलासा त्यांनी केला.
या घटनेमुळे आनंद आखाड्याचे महंत तसेच पंचांनी सागरानंद यांनी दिलेल्या पदव्या गैर ठरवत ज्या साधूंना धर्माचार्य बनविले आहे त्यांच्या पदव्या निष्कासीत करण्याची घोषणा आनंद आखाड्यानी केली आहे.
या पत्रकावर रमता पंच परमेश्वर श्री महंत काळू गिरी महाराज, श्री महंत धनराजगिरी महाराज, श्री महंत लक्ष्मण गिरी महाराज, श्री महंत कैलाशपुरी महाराज आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत. विशेष म्हणजे हे पत्रक प्रसिद्ध करताना ‘तपोनिधी श्री आनंद आखाडा पंचायती, दसनाम नागा संन्यासी कपिलधारा, वाराणसी, इलाहाबाद, (प्रयागराज), तथा त्र्यंबकेश्वर (नाशिक) असे प्रत्रक प्रसिद्ध केले आहे. (वार्ताहर)