वादग्रस्त : शनिवारी दुपारी विशेष सभा
By Admin | Updated: November 14, 2014 00:28 IST2014-11-13T23:57:16+5:302014-11-14T00:28:52+5:30
सर्वसाधारण सभेला अखेर सापडला मुहूर्त

वादग्रस्त : शनिवारी दुपारी विशेष सभा
नाशिक : विषय समित्यांच्या वाटपानंतर स्थायी समिती व अन्य विषय समित्यांच्या रिक्त जागांसाठी बोलावलेली विशेष सभा राष्ट्रवादीतच एकमत होत नसल्याने गुंडाळण्याची नामुष्की अध्यक्षांवर आलेली असतानाच, आता अचानक शनिवारी (दि. १५) दुपारी तातडीने पुन्हा ही तहकूब सभा बोलावण्याचा निर्णय अध्यक्षांनी घेतला आहे.
दरम्यान, या विशेष सभेची विषयपत्रिका व निरोप राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांच्या सदस्यांना मिळालेला नसल्याने ही सभा कायदेशीर पेचात सापडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतीलच काही सदस्यांनी सभेचा निरोप नसल्याने बहिष्काराची भाषा केली असून, शिवसेनेनेही सभेचा निरोप नसताना ती कायदेशीर कशी समजायची, असा प्रश्न उपस्थित केला आहे.गुरुवारी (दि. १३) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सामान्य प्रशासन विभागाला मागील तहकूब सर्वसाधारण सभा येत्या शनिवारी (दि. १५) दुपारी तीन वाजता घेण्याचा निर्णय घेण्यात येऊन तशी तारीख कळविण्यात आली. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाची धावपळ उडाली. सदस्यांना फोनवरून निरोप देण्याचे काम सामान्य प्रशासन विभागातील कर्मचारी करीत असल्याचे चित्र होते. राष्ट्रवादीच्या काही सदस्यांना या सभेचे निरोपच मिळालेले नाहीत. त्यामुळे सभेला येणार नसल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. तसेच शिवसेनेनेही सभा ऐनवेळी कशी बोलावली, सभेची विषयपत्रिका कशी पोहोचणार आणि सभेचे निरोप तरी कसे दिले, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. (प्रतिनिधी)