याच वेळी शहरातील तळघरे तपासावीत. अर्धवट सुरू असलेली बांधकामे तातडीने तपासावीत आणि डासांची उत्पत्ती होत असल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर कुलकर्णी यांनी दिले आहेत, तसेच ठेकेदाराच्या कारभारावरून वाद सुरू असल्याने ठेकेदारांचे काम योग्य होत नसल्यास त्यालाही दंड ठोठावण्याच्या सूचना महापौरांनी शुक्रवारी (दि. १७) घेतलेल्या बैठकीत दिल्या आहेत. उपमहापौर भिकूबाई बागूल, स्थायी समिती सभापती गणेश गिते, सभागृह नेता कमलेश बोडके यांची यावेळी उपस्थिती होती.
नाशिक शहरात यंदा डेंग्यू आणि चिकुनगुनिया रुग्णांची पाच वर्षांतील विक्रमी रुग्णसंख्या झाली आहे. डेंग्यूचे ७१७, तर चिकुनगुनियाचे ५३७ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे शुक्रवारी महापौरांनी तातडीने बैठक घेतली आणि अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
दोन्ही आजारांबाबत सर्वच जण वैद्यकीय विभागावर जबाबदारी सोपवून देत असले तरी हा विषय केवळ या विभागाचा नसून पाणीपुरवठा, भुयारी गटार योजना, नगररचना विभाग अशा सर्वच विभागांची असल्याचे महापौरांनी सांगितले. शहरातील गृहनिर्माण सोसायटीच्या अध्यक्षांना पत्र देऊन पाणी साचू देऊ नये, शहरातील प्रत्येक इमारतींची तळघरे तपासावीत. विशेषत: अर्धवट बांधकाम झालेल्या मिळकतींमध्ये मोठ्या प्रमाणात डास निर्माण होत असून, अशा ठिकाणची डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करावीत; परंतु संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी, अशा सूचना महापौरांनी दिल्या. शहरातील सोसायटी, व्यापारी संकुले इतकेच नव्हे, तर महापालिकेच्या व्यायामाशाळा, समाजमंदिरांचेदेखील ड्रेनेजचे आउटलेट तपासावे, तसेच मोकळे भूखंड त्वरित स्वच्छ करावेत, असे आदेशही महापौरांनी दिले आहेत. या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे, उपायुक्त अर्चना तांबे, करुणा डहाळे, शहर अभियंता वंजारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
इन्फो...
आतापर्यंत ४४८ जणांना नोटीस
नाशिक महापालिकेने डासांची उत्पत्तीस्थाने शोधून त्यांना पोषक वातावरण तयार केल्याबद्दल म्हणजे पाणी साचू दिल्याबद्दल ४४८ जणांना नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जीवशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र त्र्यंबके, तसेच सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी रोज सकाळी ८ ते ११ शहरात फिरून कार्यवाही करावी, अशा सूचनादेखील महापौर कुलकर्णी यांनी दिल्या आहेत.
----
छायाचित्र आर फोटोवर १७एनएमसी