दृष्टिबाधित मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या वाटा
By Admin | Updated: June 24, 2014 00:44 IST2014-06-24T00:16:50+5:302014-06-24T00:44:36+5:30
अंध मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या दृष्टीने शासन व स्वयंसेवी संस्थांच्या योजना काय आहेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नॅब संकुलात उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दृष्टिबाधित मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या वाटा
नाशिक : दहावी-बारावीनंतर डोळस विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन करणारी शिबिरे, कार्यशाळा नेहमीच होत असतात; परंतु दृष्टिबाधित (अंध) मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या वाटा सांगणारे उद्बोधन शिबिर नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लार्इंड महाराष्ट्र, कोइम्बतूरचे यू.डी.एस. फोरम आणि जर्मनीतील सी.बी.एम. इंटरनॅशनल या संस्थांनी संयुक्त राबविले. अंध मुलींसाठी राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला.
अंध मुलींसाठी उच्च शिक्षणाच्या काय काय संधी आहेत, शिक्षणाच्या दृष्टीने शासन व स्वयंसेवी संस्थांच्या योजना काय आहेत याशिवाय स्पर्धात्मक परीक्षेला कसे सामोरे जावे याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नॅब संकुलात उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांच्या या शिबिरात राज्यातील दहा जिल्ह्यांतील ४० दृष्टिबाधित मुली सहभागी झाल्या होत्या. शिबिराचे उद्घाटन सीएट कंपनीचे जनरल मॅनेजर (एच.आर.) अभय पंचाक्षरी यांच्या हस्ते झाले. एकूण दहा सत्रांमध्ये उच्च शिक्षणाच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. एस. एन. डी. टी. विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापक श्रीमती सच्चू रामलिंगम व एअर इंडियामध्ये कार्यरत असलेल्या श्रीमती परिमला भट यांनी महाविद्यालयात उपलब्ध शिक्षणाची दालने याबाबत माहिती दिली. एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयातील प्रा. सिंधू काकडे यांनी यूडीएस फोरममार्फत उच्च शिक्षणासाठी मिळणाऱ्या शिष्यवृत्तीची माहिती दिली. फोरमचे कार्यकारी संचालक एस. शंकरन यांनीही उद्बोधन केले. सूर्यभान साळुंखे व मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी नॅब महाराष्ट्रातील योजनांची सखोल माहिती दिली, तर प्रा. देवीदास गिरी यांनी स्पर्धा परीक्षांद्वारे कोणत्या संधी आहेत आणि त्यासाठी कसे सामोरे जायचे यावर मार्गदर्शन केले. यावेळी समाजकल्याण उपआयुक्त राजेंद्र कलाल, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते पी. यू. पाटील यांनी शासनाच्या योजनांची माहिती दिली. शिबिरार्थींनीही या उपक्रमाचे
स्वागत केले. संस्थेने सहभागी विद्यार्थिनींसाठी हे शिबिर विनामूल्य ठेवले होते. (प्रतिनिधी)