सफाई कामगारांना ठेकेदाराचा ठेंगा

By Admin | Updated: October 5, 2015 22:50 IST2015-10-05T22:46:59+5:302015-10-05T22:50:00+5:30

वेतन देण्यास टाळाटाळ : कामगारांची पालिकेत धडक, प्रशासनानेही हात झटकले

Contractor's job to cleaning workers | सफाई कामगारांना ठेकेदाराचा ठेंगा

सफाई कामगारांना ठेकेदाराचा ठेंगा

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील तीनही पर्वणीकाळात साधुग्रामसह भाविकमार्गावरील शौचालयांची स्वच्छता करणाऱ्या शंभरहून अधिक सफाई कामगारांना ठेकेदाराने चुना लावला असून, वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने सदर कामगारांनी सोमवारी थेट महापालिकेत धडक मारली. यावेळी प्रशासनाने सदर जबाबदारी संबंधित ठेकेदारावर ढकलत महापालिकेचा काही संबंध नसल्याचे सांगत हात झटकले. अखेर कामगारांनी उपमहापौरांना साकडे घातल्यानंतर ड्रेनेज विभागाचे एस. आर. वंजारी यांनी मंगळवारी दुपारपर्यंत कामगारांना वेतन अदा करण्याचे आश्वासन दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्यातील तीनही पर्वणीकाळात साधुग्रामसह भाविक मार्गावरील शौचालये, मुताऱ्या यांच्या स्वच्छतेचे काम ड्रेनेज विभागाने ठेकेदारामार्फत दिले. मे. बालाजी फायबर रि इनफोर्स प्रा. लिमिटेड या ठेकेदाराने सुमारे ४ कोटी रुपये खर्चाचे काम स्वीकारत ते स्थानिक कंत्राटदारांमार्फत करून घेतले. स्थानिक कंत्राटदारांनी नांदूर, मानूर तसेच पंचवटी परिसरातील शंभरहून अधिक स्त्री-पुरुष कामगारांना नांदूर-मानूर घाटावरील शौचालये व मुताऱ्या साफसफाईचे काम दिले. त्यासाठी प्रत्येकी ९ ते १२ हजार रुपये देण्याचे कबूल केल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.
सदर कामगारांना ठेकेदाराकडून नाशिक महापालिकेचे बोधचिन्ह असलेले टी शर्ट्स, तसेच बालाजी फायबर कंपनीचा शिक्का असलेले ओळखपत्रही देण्यात आले. कामगारांकडून बॅँकेच्या पासबुकांची झेरॉक्स प्रत घेण्यात आली. तीनही पर्वणीकाळात सदर कामगारांनी प्रत्येकी प्रतिदिनी ५० शौचालयांची स्वच्छता केल्याचे सांगण्यात आले. कधी भरपावसात, तर कधी दोन पाळ्यांत कामगारांनी कामे केली; परंतु सिंहस्थ कुंभपर्वकाळ संपला तरी अद्याप या कामगारांना कबूल केलेले वेतन मिळाले नाही.
सदर कामगार हे ठेकेदाराने नेमलेल्या सुपरवायझरकडे रोज पैशांसाठी चकरा मारत असतात; परंतु सुपरवायझरलाही वेतन मिळाले नसल्याचे कामगारांना समजले. संबंधित ठेकेदाराकडूनही वेतन देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे आणि महापालिकेचे अधिकारी त्यांच्या हस्ते
पाकिटातून तुम्हाला वेतनाचे वाटप करणार असल्याचे सांगत दिशाभूलही केली जात असल्याचे निदर्शनास आले.
अखेरीस महिला कामगारांनी सोमवारी नगरसेवक उद्धव निमसे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत धडक मारली आणि अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे यांच्यासमोर कैफियत मांडली.

Web Title: Contractor's job to cleaning workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.