कंत्राटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात अपर आयुक्तांना निवेदन
By Admin | Updated: June 9, 2015 02:00 IST2015-06-09T02:00:27+5:302015-06-09T02:00:48+5:30
कंत्राटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात अपर आयुक्तांना निवेदन

कंत्राटी कर्मचारी पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात अपर आयुक्तांना निवेदन
नाशिक : महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. ८) अपर आयुक्त अशोक लोखंडे यांना भेटून नव्याने कर्मचाऱ्यांची भरतीप्रक्रिया राबवू नये, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागी कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन देण्यात आले. १५ जूनपर्यंत याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास १६ जूनपासून कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोेलन छेडण्याचा इशारा राज्य आदिवासी विकास कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अपर आयुक्तांना भेटून निवेदनाद्वारे दिला. निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील कंत्राटी व मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत वेळोवेळी आंदोलने व चर्चा करण्यात आल्या आहेत. मागे काही दिवसांपूर्वी तर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार उदयसिंह पाडवी यांच्यामार्फत आंदोलनकर्त्यांना निरोप पाठवून आंदोलन मागे घेण्याबरोबरच सेवेत कायम करण्याचे आश्वासनही दिले होते. प्रत्यक्षात आता आदिवासी विकास विभागामार्फत आधी कर्मचारी भरतीची प्रक्रिया राबविण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जागी अन्य कायम सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याने एकप्रकारे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर हा अन्यायच असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांबाबत काही निर्णय न झाल्यास १६ जूनपासून राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रितेश ठाकूर, संदीप भाबड, इम्रान शेख, हर्षल बिरारी, संतोष गावत्रे, विजय वाघमारे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)