ठेकेदार न मिळण्याची हॅट्ट्रिक
By Admin | Updated: May 3, 2016 00:06 IST2016-05-02T23:43:13+5:302016-05-03T00:06:41+5:30
आयटी पार्कला प्रतिसाद नाही : पुन्हा मुदतवाढ देण्याची नामुष्की

ठेकेदार न मिळण्याची हॅट्ट्रिक
नाशिक : बारा वर्षांपूर्वी राज्य औद्योगिक विकास महामंडळाने बांधलेल्या आयटी पार्कच्या इमारतीला ठेकेदार न मिळण्याची हॅट्ट्रिक झाली आहे. महामंडळाने पार्क चालविण्यास देण्यासाठी मागविलेल्या देकाराला केवळ एका ठेकेदाराने प्रतिसाद दिला असून, त्यामुळे १६ मेपर्यंत निविदेस मुदतवाढ देण्याची नामुष्की आली आहे. परंतु या घोळामुळे पार्क सुरू होण्याची शक्यता पुन्हा दुरावली आहे.
बारा वर्षांपूर्वी महामंडळाने अतिरिक्त अंबड औद्योगिक वसाहतीत आयटी पार्क बांधला असून तो लिजने चालविण्यासाठी महामंडळाने याच महिन्यात निविदा प्रसिद्ध केली होती. यापूर्वी महामंडळाने निविदा मागवताना पार्कची तीन मजली इमारत आणि त्यालगतचा भूखंडदेखील समाविष्ट करून देकार मागविले होते. मात्र, त्यासाठी किमान सरकारी किंमत जास्त होती. यंदा मात्र, हा भूखंड अॅमॅनिटिज प्लॉट असल्याचे सांगून तो वगळण्यात आला. आणि किमान सरकारी किंमत घटविल्याचा दावा करण्यात आला होता त्यानुसार ५ कोटी ८७ लाख रुपये अशी किमान सरकारी रक्कम दाखविण्यात आली होती. मात्र, दोन कोटी २३ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ही इमारत घसारा तर दूरच उलट बांधकामावर दरवर्षी १२ टक्के व्याज दर्शवून भाड्याची किंमत पाच कोटी ८७ लाख रुपये करण्यात आल्याने कितपत प्रतिसाद मिळेल याबाबत साशंकता होती. ‘लोकमत’ने याबाबत अधिकाऱ्यांच्या मानसिकतेतुळे आयटी पार्कचा लिलाव वादात सापडल्याचे स्पष्ट केले होते. अखेरीस हेच खरे ठरले आहे. २६ एप्रिलपर्यंत म्हणजेच देकार सादर करण्याच्या अखेरच्या दिवशी केवळ एकच निविदा प्राप्त झाल्याने अखेरीस निविदांसाठी मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १६ मेपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)