कंत्राटी कामगार वेतन भत्त्यापासून वंचित
By Admin | Updated: December 24, 2016 01:26 IST2016-12-24T01:26:11+5:302016-12-24T01:26:30+5:30
आरोग्य विद्यापीठ : सेवेत कायम करण्याची मागणी

कंत्राटी कामगार वेतन भत्त्यापासून वंचित
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कंत्राटी कामगार संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देण्यात आले.
विद्यापीठात कमी मनुष्यबळ असल्याने जवळपास ३५० ते ४०० कंत्राटी कामगार विद्यापीठात कार्यरत आहे. त्यातील ३५ ते ४० कर्मचारी हे आठ ते दहा वर्षांपासून आहेत. महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठामधील रोजंदारी मजूर, कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांना शासनाने २४ जुलै च्या शासननिर्णयानुसार विद्यापीठ सेवेत कायमस्वरूपी सामावून घेतले आहे. त्याच निर्णयानुसार आरोग्य विद्यापीठातील अनेक वर्षांपासून काम करीत असलेल्या या रोजंदारी कर्मचाऱ्यांना विद्यापीठात सामावून घेण्याची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
विद्यापीठात काम करीत असलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत कामगार उपआयुक्त नाशिक विभाग यांच्या दालनात संयुक्त बैठकदेखील झालेली आहे, परंतु अद्यापही विद्यापीठ प्रशासनाने कुठल्याही प्रकारची विद्यापीठ व संघटना यांच्यात बैठक आयोजित केलेली नाही. त्यामुळे कंत्राटी कामगार कायदा अधिनियमाची काटेकोर अंमलबजावणी विद्यापीठ करीत नसल्याचेही संघटनेचे म्हणणे आहे. विद्यापीठाच्या कामगार विरोधी धोरणामुळे कामगारांचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे कामगार विरोधी धोरणामुळे कामगारांचा प्रश्न प्रलंबित असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
याप्रकरणी लक्ष देऊन कंत्राटी कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करून नियमानुसार वेतन द्यावे, जे कर्मचारी विद्यापीठ सेवेत अनेक वर्ष काम करीत आहेत त्यांना कायम करण्यात यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळणारे लाभ नियमाप्रमाणे देण्यात यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. (प्रतिनिधी)