विनापरवाना जलवाहिनीचे काम सुरू
By Admin | Updated: July 14, 2016 01:27 IST2016-07-14T01:21:53+5:302016-07-14T01:27:04+5:30
मंजुरी कशी मिळाली : छावणी परिषदेच्या कारभाराविषयी संशय; आश्चर्य व्यक्त

विनापरवाना जलवाहिनीचे काम सुरू
देवळाली कॅम्प : देवळाली छावणी परिषदेने लॅमरोड महालक्ष्मी मंदिरापासून नव्याने बांधण्यात येत असलेल्या नवधन व्हिला या इमारतीपर्यंत परवानगी नसताना पाण्याची पाइपलाइन टाकत असल्याने छावणी प्रशासनाच्या कारभाराबाबत संशय व्यक्त केला जात आहे.
देवळाली छावणी परिषदेमध्ये २०१२ ला पाण्याच्या पाइपलाइनसाठी नवीन आराखड्याला जीवन प्राधीकरण विभागाकडून मंजुरी देण्यात आली होती. मंजूर केलेली पाण्याची पाइपलाइन ही महालक्ष्मी रोडहून साकूरकर चाळ परिसरापर्यंत टाकण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार पाण्याची पाइपलाइनदेखील टाकण्यात आली होती. मात्र पाइपलाइनच्या आराखड्यामध्ये समावेश नसताना व इमारत पूर्ण झाल्याचा दाखला दिलेला नसतानादेखील श्री महालक्ष्मी मंदिरापासून नव्याने बांधण्यात येत असलेल्या नवधन व्हिला रहिवासी इमारतींसाठी जवळपास अर्धा किलोमीटर लांबीची सहा इंचाची पाइपलाइन टाकण्याचे काम छावणी परिषदेकडून गेल्या तीन दिवसांपासून हाती घेतले आहे. महालक्ष्मी मंदिर परिसरात गेल्या ३०-३५ वर्षांपासून राहणाऱ्या रहिवाशांना जुन्या १ इंची पाइपलाइनमधून पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे. त्याच ठिकाणी नवीन पाइपलाइन टाकल्यावर त्या रहिवाशांना नव्याने कनेक्शन देण्यात आले नाही. मात्र अद्याप इमारत पूर्ण बांधून झालेली नसताना व आराखड्यात समावेश नसताना देखील छावणी प्रशासनाने श्री महालक्ष्मी मंदिरापासून नव्याने बांधण्यात येणाऱ्या नवधन व्हिला रहिवासी संकुलापर्यंत पाइपलाइन टाकण्याचे काम हाती घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (वार्ताहर)लॅमरोड श्री महालक्ष्मी मंदिरामागे जेसीबीच्या साह्याने टाकण्यात येणारी पाण्याची पाइपलाइन.