जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
By Admin | Updated: July 4, 2017 00:17 IST2017-07-04T00:17:38+5:302017-07-04T00:17:55+5:30
३० टक्के पर्जन्यवृष्टी : धरण साठ्यात वाढ

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, मालेगाव व नांदगाव तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही हजेरी कायम ठेवल्याने जिल्ह्णाच्या एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्णातील धरणांच्या साठ्यातही कमालीची वाढ होऊन २३ टक्के साठा शिल्लक आहे.
सोमवारी सकाळी काहीशी विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शन घेता आले, त्यानंतर मात्र पावसाने दुपारी पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांची काहीशी धावपळ उडाली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी सुरक्षित आसरा शोधला. दिवसभर अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. नाशिकसह जिल्ह्णातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी कायम ठेवल्याने शेतीकामांनी वेग घेतला असून, विशेष करून इगतपुरी, पेठ, त्र्यंबक, सुरगाणा या भागात भाताची आवणी केली जात आहे तर अन्य ठिकाणी मका व सोयाबीनच्या लागवडीत शेतकरी व्यस्त झाला आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे तेथील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्णात ३१२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जुलै महिन्याच्या एकूण पावसाचा विचार करता दोन दिवसातच १७ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्याची सरासरी ५६७१ मिलिमीटर इतकी असून, त्यापैकी दोन दिवसात ९९८ मिलिमीटर पाऊस झाल्याची आकडेवारी शासकीय यंत्रणेने दिली आहे. जून व जुलै या दोन महिन्यांच्या पावसाचा विचार करता वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त आठ टक्के इतके होते.
तालुकानिहाय पर्जन्यवृष्टी
जिल्ह्णात गेल्या चोवीस तासांत झालेला पाऊस पुढीलप्रमाणे- कंसात आजवर झालेला एकूण पाऊस
नाशिक - ४७ (४४५), इगतपुरी - ४७ (९९५), दिंडोरी - १३ (१४५), पेठ - ६४ (५४४), त्र्यंबकेश्वर - ३० (६६९), मालेगाव - ०(१३६), नांदगाव - १२ (२०३), चांदवड - ६ (१९६), कळवण - १९ (१४२), बागलाण- २ (११६), सुरगाणा - ५३ (४४९), देवळा - १ (९८), निफाड - ६ (११४), सिन्नर- ३ (१६२), येवला- ८ (११९) मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
दारणा धरण निम्मे भरले
पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे जिल्ह्णातील धरण साठ्यांमध्ये कमालीची वाढ झाली असून, सरासरी २३ टक्के पाणी जिल्ह्णातील धरणांमध्ये उपलबध आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३८ टक्के तर संपूर्ण धरण समूहात २९ टक्के पाणी साठले आहे. इगतपुरी परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे दारणा धरण निम्मे भरले असून, या धरणाच्या क्षमतेच्या ५१ टक्के पाणी साठले आहे. तर भावली धरणही ४७ टक्के भरले आहे. नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात ८२ टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. चणकापूर २६ टक्के, गिरणा २६ टक्के, हरणबारी १३ टक्के इतके भरले आहे. टंचाईग्रस्त गावांच्या टॅँकरचा फेरआढावा
टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या टॅँकरची मुदत जूनअखेर संपुष्टात आल्याने जिल्ह्णातील ३१ टॅँकर गेल्या तीन दिवसांपासून बंद करण्यात आल्याने पाच तालुक्यांतील १०५ गावे, वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्हा प्रशासनाने उपविभागीय अधिकाऱ्यांना टंचाईचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.