जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
By Admin | Updated: July 3, 2017 18:51 IST2017-07-03T18:51:45+5:302017-07-03T18:51:45+5:30
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, मालेगाव व नांदगाव तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही हजेरी

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम
नाशिक : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, मालेगाव व नांदगाव तालुका वगळता अन्य तालुक्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही हजेरी कायम ठेवल्याने जिल्ह्याच्या एकूण वार्षिक सरासरीच्या तुलनेत जुलैच्या पहिल्या आठवड्यातच ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. पावसाच्या संततधारेमुळे जिल्ह्यातील धरणांच्या साठ्यातही कमालीची वाढ होऊन २३ टक्के साठा शिल्लक आहे. सोमवारी सकाळी काहीशी विश्रांती घेतल्यामुळे नागरिकांना सूर्यदर्शन घेता आले, त्यानंतर मात्र पावसाने दुपारी पुन्हा हजेरी लावल्याने नागरिकांची काहीशी धावपळ उडाली. अनेकांनी पावसापासून बचावासाठी सुरक्षित आसरा शोधला. दिवसभर अधूनमधून हजेरी लावलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला. नाशिकसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने कमी-अधिक प्रमाणात हजेरी कायम ठेवल्याने शेतीकामांनी वेग घेतला असून, विशेष करून इगतपुरी, पेठ, त्र्यंबक, सुरगाणा या भागात भाताची आवणी केली जात आहे तर अन्य ठिकाणी मका व सोयाबीनच्या लागवडीत शेतकरी व्यस्त झाला आहे. नांदगाव, मालेगाव, बागलाण या तालुक्यांकडे पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे तेथील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत म्हणजेच सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३१२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून, जुलै महिन्याच्या एकूण पावसाचा विचार करता दोन दिवसातच १७ टक्के पाऊस झाला आहे. जुलै महिन्याची सरासरी ५६७१ मिलिमीटर इतकी असून, त्यापैकी दोन दिवसात ९९८ मिलिमीटर पाऊस झाल्याची आकडेवारी शासकीय यंत्रणेने दिली आहे. जून व जुलै या दोन महिन्यांच्या पावसाचा विचार करता वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ३० टक्के पाऊस नोंदविला गेला आहे. गेल्या वर्षी हेच प्रमाण फक्त आठ टक्के इतके होते.