बांधकाम ठेकेदाराचा खून

By Admin | Updated: October 2, 2015 22:45 IST2015-10-02T22:44:29+5:302015-10-02T22:45:54+5:30

मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांचा नकार

Construction Contractor's Blood | बांधकाम ठेकेदाराचा खून

बांधकाम ठेकेदाराचा खून

नाशिक : सिडकोतील कामटवाडे शिवातील डीजीपीनगरमध्ये राहणारे बांधकाम ठेकेदार मोतीलाल महंत पंडित (४७) यांचा अज्ञात इसमांनी निर्घृण खून करून गंगापूरधरणालगत मृतदेह बेवारस फेकून दिल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पंडित यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांच्या नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देऊन गोंधळ घातला.
बांधकाम व्यावसायिकांकडे ठेकेदारी पद्धतीने काम करणारे पंडित हे गुरुवारी रात्री त्यांना अज्ञात व्यक्तीने त्यांना भ्रमणध्वनी करून दहा रो हाऊसचे काम द्यायचे असल्याने चर्चेसाठी या असे सांगून बोलावून घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या कुटुंबीयांनी वाट पाहिली परंतु ते आले नाहीत, त्याचबरोबर त्यांचा भ्रमणध्वनीही नंतर स्विच आॅफ झाल्यामुळे कुटुंबीयांची घालमेल वाढली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिक-गिरणारे रस्त्यावरील गोवर्धन शिवारात एका महाविद्यालयाच्या पाठीमागील कॅनॉलमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बेवारस पडल्याची खबर गोवर्धनचे पोलीस पाटील कैलास वाघचौरे यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्याला दिली.
तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार आचार्य यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अज्ञात व्यक्तीच्या तोंडावर, डोक्यावर काही तरी धारदार शस्त्राने वार करून त्याचा मृतदेह कॅनॉलजवळ आणून टाकल्याचे दिसून आले. तसेच ओळख पटू नये म्हणून त्याच्या अंगावरील कपडेही काढून घेण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी आजूबाजूला तपास केला असता, ओळख पटविणे अशक्य झाल्याने मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून सदरचे छायाचित्र व्हायरल झाल्याने सायंकाळी पंडित यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन खात्री केली असता, त्यात ही बाब उघडकीस आली.
या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पंडित यांनी महिरावणीला कोणते काम घेतले होते, तसेच त्यांच्या संपर्कात कोण कोण होते याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. परंतु मारेकऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी करीत पंडित यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयातून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत याबाबत गोंधळ सुरू होता.(प्रतिनिधी)

Web Title: Construction Contractor's Blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.