मतदारसंघांची अदला-बदल होणार
By Admin | Updated: July 12, 2014 00:24 IST2014-07-11T23:57:25+5:302014-07-12T00:24:22+5:30
मतदारसंघांची अदला-बदल होणार

मतदारसंघांची अदला-बदल होणार
नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी विभागनिहाय आढावा बैठकीत नाशिक शहरातून दोन, तर ग्रामीण भागातून तीन अशा पाच वाढीव मतदारसंघांची मागणी करण्यात आल्याचे वृत्त आहे. उत्तर महाराष्ट्रातही भाजपाच्या वाट्याला ५० टक्के जागा असाव्यात,असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरल्याचे कळते.
येथे भाजपाच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात नाशिक शहर, मालेगाव शहर व उर्वरित जिल्हास्तरावरील पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडवणीस यांच्यासह कोअर कमिटी सदस्य विरोधी पक्षनेते आमदार विनोद तावडे, आमदार पंकजा मुंडे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, निरीक्षक आमदार राम शिंदे, आमदार गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल आदिंच्या उपस्थितीत झाली. सकाळी नाशिक जिल्ह्णाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी नाशिक शहरातील पदाधिकाऱ्यांनी मागील वेळेच्या पूर्व व पश्चिम मतदारसंघच नव्हे, तर मध्य आणि देवळाली विधानसभा मतदारसंघही भाजपानेच लढवावेत,अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांनी केवळ बागलाण आणि मालेगाव मध्य हे दोेन मतदारसंघच नव्हे तर सिन्नर, नांदगाव व कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघातूनही भाजपानेच निवडणूक लढवावी,अशी आग्रही मागणी लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी केल्याचे समजते. स्वबळावर लढण्याची वेळ आली तर ग्रामीण भागातील १२ विधानसभा मतदारसंघांत उमेदवार आहेत. फक्त निर्णय घ्या,अशी आग्रही भूमिकाही पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे समजते. यावेळी नाशिक नंतर नंदुरबार,जळगाव, धुळे व अहमदनगर जिल्ह्णांचा आढावा घेण्यात आला. उत्तर महाराष्ट्रातूनही भाजपाने ५० टक्के मतदारसंघातून नशीब अजमावे,असे ठरल्याचे कळते. यावेळी माजी मंत्री डॉ. दौलतराव अहेर, बिरदीचंद नहार, सीमा हिरे,स्मिता वाघ,जिल्हा परिषद सदस्य मनीषा बोडके, जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, गिरीश पालवे,माजी महापौर बाळासाहेब सानप, उपमहापौर सतीश कुलकर्णी, नितीन वानखेडे,जयश्री दौंड, सुरेश पाटील, देवयानी फरांदे, गोपाळ पाटील, विजय साने,गणेश कांबळे, प्रशांत जाधव,जगन पाटील,अलका अहिरे,सुनील केदार,अजित ताडगे, सोेमनाथ बोडके,प्रदीप पेशकार,अमित घुगे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)