लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदासाठी दि. २० मे रोजी सकाळी १०.३० वाजता निवडणूक घेण्यात येणार असून सभापतिपदासाठी कॉँग्रेसची दावेदारी प्रबळ आहे. राष्ट्रवादी आणि मनसेच्या साथीने कॉँग्रेसचा सभापती पहिल्या वर्षी विराजमान होण्याची शक्यता असून, त्यासाठी समीर कांबळे व डॉ. हेमलता पाटील यांची नावे चर्चेत आहेत. महापालिकेच्या नगरसचिव विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार विभागीय आयुक्तांनी प्रभाग समिती सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. पश्चिम प्रभाग समितीच्या सभापतिपदासाठी दि. २० मे रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. नवीन प्रभाग रचनेनुसार पश्चिम प्रभाग समितीत प्रभाग क्रमांक ७, १२ आणि १३ हे तीन प्रभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. पश्चिम प्रभाग समितीवर भाजपा-४, शिवसेना-२, कॉँग्रेस-४, राष्ट्रवादी-१ आणि मनसे-१ असे पक्षीय बलाबल आहे. पश्चिम प्रभाग समितीवर भाजपाच्या हिमगौरी अहेर-आडके, योगेश हिरे, प्रियंका घाटे व शिवाजी गांगुर्डे, शिवसेनेचे अजय बोरस्ते व नयना गांगुर्डे, कॉँगे्रसचे समीर कांबळे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे व शाहू खैरे, राष्ट्रवादीचे गजानन शेलार व मनसेच्या सुरेखा भोसले हे सदस्य आहेत. समितीवर कुणाही एका पक्षाचे बहुमत नाही. त्यामुळे कॉँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे हे तीनही पक्ष एकत्र आल्यास आणि मागील पंचवार्षिक काळाप्रमाणेच त्यांनी आपली आघाडी पुढे चालू ठेवल्यास त्यांचे सहा सदस्य होतात. भाजपाचे ४ व सेनेचे २ सदस्य आहेत. सद्यस्थितीतील राजकारण पाहता शिवसेना भाजपाला साथ देणे शक्य नाही. त्यामुळे शिवसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेत विरोधी कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मनसे आघाडीला मदत केल्यास विरोधकांच्या ताब्यात समिती जाऊ शकते. भाजपाबरोबरीने कॉँग्रेसचे संख्याबळ असल्याने पहिल्या वर्षी कॉँग्रेसने सभापतिपदासाठी दावेदारी केल्याचे समजते. त्यामुळे समीर कांबळे व डॉ. हेमलता पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
सभापतिपदावर काँगे्रसचा दावा
By admin | Updated: May 6, 2017 01:31 IST