निवडणुकीसाठी कॉँग्रेस ‘जोमात’
By Admin | Updated: July 29, 2016 01:43 IST2016-07-29T01:36:52+5:302016-07-29T01:43:41+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था : पक्षश्रेष्ठी नाशकात

निवडणुकीसाठी कॉँग्रेस ‘जोमात’
नाशिक : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सहा महिन्यांचा कालावधी शिल्लक असला तरी, कॉँग्रेसने या निवडणुकांना जय्यत तयारीने सामोरे जाण्याचा निर्णय घेतला असून, मतदार संघ व उमेदवारनिहाय पूर्वतयारीचा आढावा खुद्द प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घेणार आहेत. त्यासाठी गुरुवारपासून दोन दिवस चव्हाण नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत.
आगामी सहा ते आठ महिन्यांचा कालावधी निवडणुकांचा असून, नाशिक जिल्ह्णात डिसेंबरमध्ये नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ व त्याचबरोबर जिल्ह्यातील येवला, मनमाड, नांदगाव, सटाणा, भगूर व सिन्नर या नगरपालिकांच्याही विद्यमान नगरसेवकांची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे साधारणत: आॅक्टोबर अखेर वा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या नगरपालिकांची निवडणूक होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर आत्तापासूनच प्रभाग रचना, आरक्षण यांसारख्या बाबींची तयारी केली जात आहे. त्यानंतर फेब्रुवारी व मार्च महिन्यात नाशिक महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी हळूहळू सुरू झाली असून, आंदोलने, विकासकामांच्या माध्यमातून उमेदवारांकडून चाचपणी केली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसने सर्वांत अगोदर आघाडी घेतली
आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या तयारीचा आढावा घेण्यासाठी
नाशिक मुक्कामी येत असून, त्यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्ह्याचे प्रभारी आमदार के. सी. पाडवी, प्रदेश सचिव डी. जी. पाटील उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)