त्र्यंबकमध्ये कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला
By Admin | Updated: February 25, 2017 00:13 IST2017-02-25T00:13:06+5:302017-02-25T00:13:19+5:30
त्र्यंबकमध्ये कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला

त्र्यंबकमध्ये कॉँग्रेसला अतिआत्मविश्वास नडला
वसंत तिवडे :त्र्यंबकेश्वर
तालुक्यात प्रत्येक वेळेस सत्तेची समीकरणे बदलत असल्याचा इतिहास आहे. यंदा काँग्रेसला ‘ओव्हर कॉँफिडेन्स’मुळे पराभवाचे धनी व्हावे लागले आहे. तालुक्यातील तीन गट व सहा गणांमध्ये उमदवारांना संमिश्र अन् अनपेक्षित कौल मिळाला आहे. यामुळे राजकीय समीकरणे बदलणार असून आगामी राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे. हरसूल गटात राष्ट्रवादी पुरस्कृत (अपक्ष) उमेदवार रुपांगली माळेकर तर अंजनेरी गटात शंकुतला डगळे (काँग्रेस) ठाणापाडा गटातून माकपाच्या रमेश बरक विजयी झाले आहेत. गेल्या मागच्या निवडणूकीत हरसूल गट ओबीसी राखीव होता. अंजनेरी गटात शिवसेनेचे कमळू कडाळी विजयी झाले होते. गणातदेखील सेनेचे मनोहर मेढे यांनी बाजी मारली होती. सन २००७ मध्ये माकपाने करिष्मा दाखवत ठाणापाडा गट ताब्यात घेतला होता. पेठ आणि सुरगाणा या भागावर जसे माकपाचे वर्चस्व आहे तसेच पूर्वीच्या पेठ तालुक्यात असलेल्या ठाणापाडा भागात आजही माकपाचे वर्चस्व आहे. वनहक्क कायद्याच्या जमिनी असो की, शिधापत्रिका असो किंवा अन्य प्रश्नांसाठी माकपाची एकजूट पहावयास मिळते. या निवडणुकीत त्याच एकजुटीचा तसेच काँग्रेसच्या ‘ओव्हर कॉँफीडन्स’चा फायदा घेऊन माकपाने ठाणापाडा गट ताब्यात घेतला. त्यातल्या त्यात घराणेशाहीचाही आरोप झाला.
हरसूल गटातील उमेदवार देवीदास माळेकर (काँग्रेस) यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या अर्जावर हरकत घेतल्याने विनायक माळेकर यांचा अर्ज बाद झाल्याने काँग्रेसच्या रणनीतीचा ठाणापाडा व हससूल गट व गणांवर परिणाम झाला. त्यांना पराभवाचा धक्का बसला. विनायक माळेकर सारस्ते येथील रहिवासी असून सन २००२ मध्ये त्यांचे बंधू लक्ष्मण शंकर माळेकर हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. शंकर माळेकर काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांच्या रणनितीमुळे लक्ष्मण माळेकर विजयी झाले होते. माळेकर त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवित होते मात्र त्यांचा अर्ज बाद झाला. त्यांच्या पत्नीने अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसने त्यांना पुरस्कृत म्हणून घोषित केले. त्यांना सहानुभूतीचा फायदा झाला. एवढेच नव्हे तर ठाणापाडा गट गण हरसूल गट गण येथेही याच लाटेचा फायदा होऊन आमदारपुत्र हर्षल गावित यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. ज्यांच्यामुळे सहानुभूती मिळाली त्या देवीदास माळेकर यांना तर पराभव पत्कारावा लागला. त्यांच्या बरोबर हरसूल गणातील राष्ट्रवादी काँग्रेसचे रविंद्र भोये विजयी झाले तर वाघेरा गणात स्थानिक उमेदवार असतांनाही अवघ्या ८ मतांनी काँग्रेसचे वाघेरा येथील सरपंच जयराम मोंढे यांनाही काठावर पराभव पत्कारावा लागला. ज्यांच्याकडून पराभव झाला ते मोतीराम दिवे वाघेरा गणातीलच दिव्याचा पाडा येथील रहिवासी असून ते या पूर्वी दोन वेळा एकदा काँग्रेस, एकदा राष्ट्रवादी आणि या वेळेस भाजपकडे ते उमेदवारी मागत होते. त्यांच्यासाठी सुरेश गंगापुत्र यांनी भाजपाकडे आग्रह केला होता. शेवटी ते अपेक्षरित्या निवडून आले. विशेष म्हणजे ही चौथी पंचवार्षिक निवडणूक असून वीस वर्षात भाजपला पंचायत समिती की जि.प.गटात साधे खाते देखील खोलता आलेले नाही. इतरत्र भाजपाचा बोलबोला असला तरी त्र्यंबक तालुका भाजपाला स्विकारण्यास तयार नाही. मोतीराम देशमुख सारखा उच्च शिक्षित प्राचार्य उमेदवार (हरसूल गटात) करीत असतांना स्थानिक असूनही लोकांनी स्विकारले नाही. याचे कारण भाजपामधील बेबनाव कारणीभूत ठरला. शहर-ग्रामीण कार्यकर्त्यांमधील अंतर्गत धूसपूस पराभवास कारणीभूत ठरली. सन २०१२ च्या निवडणूकीत तालुक्यावर आमदार निर्मला गावित, संपतराव सकाळे यांचा पूर्ण प्रभाव तीन पैकी दोन जागा मिळवून तालुक्यावर एक हाती सत्ता प्रस्थापित केली. याबद्दल काँग्रेस नेत्यांना ओव्हर कॉन्फीडेंन्स वाढला. अंजनेरी गट व देवगाव गण वगळता बाकी सर्व ठिकाणी काँग्रेसला सपाटून मार बसला. अंजनेरी गणातील माजी सभापती देवराम भुस्मा यांच्या सूनबाई यांनाही निसटता विजय मिळून त्या सेनेकडून (मनाबाई भुस्मा) विजयी झाल्या. सेनेला ही एकमेव जागा मिळाली. काँग्रेस अंजनेरी गट- अंजनेरी गण, काँग्रेस-१ व गण १, मार्क्सवादी- ठाणापाडा गट, ठाणापाडा गण व मूळवड गण, हरसूल गट व हरसूल गण- राष्ट्रवादी काँग्रेस, वाघेरा गण- अपक्ष अशी तालुक्यात त्रिशंकू अवस्था आहे.