गावठाणात कॉँग्रेस आघाडीचा वरचष्मा
By Admin | Updated: February 24, 2017 01:38 IST2017-02-24T01:38:29+5:302017-02-24T01:38:43+5:30
भाजपाला बारा जागा : मनसे-कॉँग्रेस आघाडीचा पॅटर्न यशस्वी

गावठाणात कॉँग्रेस आघाडीचा वरचष्मा
संजय शहाणे इंदिरानगर
नाशिक पूर्व विभागातील गावठाणासह मुस्लीम बहुल भागात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह मनसेला सोबत घेऊन राबविलेल्या पॅटर्नने सेना-भाजपाला दणका दिला. पूर्व विभागातील २३ जागांपैकी १२ जागांवर भाजपाने यश संपादन केले, तर राष्ट्रवादीने ५, कॉँग्रेसने ४, मनसेने १ आणि अपक्षाने एक जागा जिंकली. या विभागात प्रामुख्याने, माजी महापौर यतिन वाघ यांच्यासह मनसेच्या मेधा साळवे, भाजपाचे कुणाल वाघ, सेनेच्या नंदिनी जाधव, राष्ट्रवादीच्या नीलिमा आमले, अपक्ष रशिदा शेख व शिक्षण सभापती संजय चव्हाण यांना पराभवाचा सामना करावा लागला.
नाशिक पूर्व विभागात प्रभाग क्रमांक १३, १४, १५, १६, २३ आणि ३० या सहा प्रभागांचा समावेश होता. सकाळी १० वाजता प्रभाग क्रमांक १३ ते १५ ची मतमोजणी शालिमारवरील महात्मा फुले कलादालनात तर प्रभाग १६, २३ आणि ३० ची मतमोजणी दीपालीनगर येथील शर्मा मंगल कार्यालयात सुरू झाली. पूर्व विभागात प्रामुख्याने संवेदनशील मानल्या जाणाऱ्या प्रभाग क्रमांक १३ मधील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. याठिकाणी मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले माजी महापौर यतिन वाघ यांना पराभवाचे धनी व्हावे लागले.
राष्ट्रवादीचे गजानन शेलार यांनी वाघ यांचा २९९७ मतांनी पराभव केला. प्रभाग १३ मध्ये कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी आघाडी केली होती. या आघाडीने सेना-भाजपाला दणका दिला. प्रभाग १४ मध्ये मोठ्या प्रमाणावर उमेदवार होते. परंतु, याठिकाणी राष्ट्रवादीने शोभा साबळे, समिना मेमन व जीन सुफीयान यांच्या रूपाने तीन जागा खिशात टाकल्या तर माजी नगरसेवक मुशीर सय्यद हे अपक्ष म्हणून निवडून आले. प्रभाग क्रमांक १५ मधील लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागून होते. याठिकाणी माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते रिंगणात होते. त्यामुळे गिते यांच्या एकूणच राजकीय अस्तित्वाची मोठी लढाई होती. प्रभाग १५ मध्ये तीनही जागांवर भाजपाने यश संपादन केले.
प्रथमेश गिते यांनी तीन विद्यमान नगरसेवक गुलजार कोकणी, संदीप लेनकर व शिवसेनेचे सचिन मराठे यांना धोबीपछाड दिली. प्रभाग १६ मध्ये राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे, कॉँग्रेसच्या आशा तडवी व नगरसेवक राहुल दिवे यांनी बाजी मारली. भाजपाचे अनिल ताजनपुरे यांनी विजय संपादन केला. प्रभाग २३ आणि ३० मध्ये भाजपाने सर्वच्या सर्व जागा खिशात टाकल्या. रुपाली निकुळे, शाहीन मिर्झा, सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, दीपाली कुलकर्णी, सतीश सोनवणे यांनी विजयाला गवसणी घातली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शाहू खैरे यांच्या विजयानंतर भालेकर मैदानावर समर्थकांनी असा जल्लोष केला.