स्थायी प्रकरणी नगरसेवक गांगुर्डे यांना कॉँग्रेसची नोटीस?
By Admin | Updated: June 7, 2014 01:49 IST2014-06-07T00:58:21+5:302014-06-07T01:49:30+5:30
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत सदस्यपदाच्या वादावरून कॉँग्रेसमध्ये जुंपली

स्थायी प्रकरणी नगरसेवक गांगुर्डे यांना कॉँग्रेसची नोटीस?
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीत सदस्यपदाच्या वादावरून कॉँग्रेसमध्ये जुंपली असून, समितीचे विद्यमान सदस्य शिवाजी गांगुर्डे यांनी राजीनामा द्यावा, यासाठी सूचना करण्यात आली. मात्र त्यानंतरही गांगुर्डे यांनी राजीनामा न दिल्याने पक्षाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. अर्थात, गांगुर्डे यांनी त्याचा इन्कार केला आहे.
स्थायी समितीच्या सदस्यांची पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्ती होते. त्यामुळे कॉँग्रेस पक्षाचे शिवाजी गांगुर्डे यांनी समिती सदस्यपदाचा राजीनामा दिल्यास त्यांच्या जागी कॉँग्रेस नगरसेवकाचीच नियुक्ती होऊ शकेल. गांगुर्डे यांची स्थायी समितीतील नियुक्ती दोन वर्षांकरिता आहे, परंतु मनसे आणि राष्ट्रवादीप्रमाणेच कॉँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांचा राजीनामा घेऊन अन्य नगरसेवकाला संधी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात गटनेते लक्ष्मण जायभावे यांनी गांगुर्डे यांना सूचित केले, परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे पक्षाचे प्रभारी भाई जगताप यांनी त्यांना नोटीस बजावल्याचे वृत्त आहे. अर्थात गांगुर्डे यांनी त्याचा इन्कार केला आहे. महापालिका प्रांतिक अधिनियमानुसार स्थायी समितीत कोणत्याही सदस्याची नियुक्ती दोन वर्षांकरिता असते. परंतु गांगुर्डे यांची नियुक्ती होऊन एक वर्ष झाले आहे. त्यामुळे मुळातच दोन वर्षे नियुक्ती असलेल्या सदस्याला त्याचा कार्यकाळ अपूर्ण असताना राजीनामा मागणे हे कायद्याला धरून नाही, असे गांगुर्डे यांचे म्हणणे आहे.
यासंदर्भात त्यांनी पक्षाला लेखी पत्र पाठविल्याचे वृत्त आहे. आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नाही, केवळ तोंडी सूचना करण्यात आली होती, असेही त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)