कॉँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान
By Admin | Updated: January 12, 2017 01:23 IST2017-01-12T01:23:22+5:302017-01-12T01:23:38+5:30
कॉँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान

कॉँग्रेस-राष्ट्रवादीसमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान
गणेश धुरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या दहाव्या पंचवार्षिक निवडणुकांचा बिगुल वाजला असून, स्थापनेपासून सलग पंचवीस वर्षे सत्तेत राहणाऱ्या कॉँग्रेस आणि आताची वीस वर्षे सत्तेत राहणाऱ्या राष्ट्रवादी कॉँग्रेससमोर सत्ता टिकविण्याचे आव्हान राहणार आहे. कॉँग्रेसने स्थापनेच्या १९६२ पासून सलग २५ वर्षे, तर १९९२ नंतर शिवसेना व माकपचा प्रत्येकी एक अपवाद वगळता राष्ट्रवादी कॉँग्रेसने २० वर्षे जिल्हा परिषदेवर सत्ता राखली आहे. जिल्हा परिषदेची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली. जिल्हा परिषदेच्या पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत कॉँग्रेसकडून भानुदास कवडे यांना अध्यक्षपद भूषविण्याची संधी लाभली. त्यानंतर सातत्याने १९६२ ते १९६७, १९६७ ते १९७२, १९७२ ते १९७७ तसेच १९७७ ते १९७९ या काळात कॉँग्रेसनेच सत्ता राखली. मधल्या काळात केवळ नाशिकच्याच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांवर सलग ११-१२ वर्षे प्रशासकीय कारकीर्द राहिली. त्यानंतर १९९२ साली कॉँग्रेसकडूनच गोपाळराव गुळवे यांनी सलग पाच वर्षे अध्यक्षपद राखले. त्यानंतरच्या काळात पांडुरंग राऊत यांच्या रूपाने शिवसेनेचा पहिल्यांदाच भगवा मिनी मंत्रालयावर फडकला. त्यानंतर पंढरीनाथ थोरे, अनिलकुमार अहेर, विद्या पाटील, के. के. पवार, पंढरीनाथ थोरे, राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, जयश्री पवार व आताच्या विजयश्री चुंभळे यांच्या रूपाने अध्यक्षपद भूषविण्याची संधी राष्ट्रवादीला लाभली. त्यातील अनिलकुमार अहेर व के. के. पवार यांचा अपवाद होता. अनिलकुमार अहेर कॉँग्रेसकडून तर के. के. पवार यांनी माकपकडून अध्यक्षपद भूषविले. आता ७३ गटांसाठी जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यातील ३७ गट महिलांसाठी तर ३६ गट पुरुष राखीव आहेत. अर्थात पुरुष राखीव गटातून महिलांनाही उभी राहण्याची संधी आहे. त्यातील सर्वाधिक २९ गट अनुसूचित जमाती संवर्गासाठी तर २० गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी तसेच १९ गट सर्वसाधारण संवर्गासाठी तर पाच गट अनुसूचित जाती संवर्गासाठी राखीव आहेत. नगरपालिका निवडणुकांचा कल पाहता राष्ट्रवादी व कॉँग्रेससमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. नाशिक जिल्हा परिषदेसाठी दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, २३ फेब्रुवारीला मतमोजणी राहणार आहे.