नोटाबंदी विरोधात कॉँग्रेसचा मोर्चा
By Admin | Updated: January 7, 2017 01:15 IST2017-01-07T01:14:11+5:302017-01-07T01:15:00+5:30
अचानक रास्ता रोको : नाराज गटाचीही हजेरी

नोटाबंदी विरोधात कॉँग्रेसचा मोर्चा
नाशिक : केंद्र सरकारने केलेल्या नोटबंदीमुळे जनता त्रस्त झाल्याने शासनाने त्यांना नुकसानभरपाई द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी कॉँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून भाजपा सरकार विरुद्ध जोरदार घोेषणाबाजी तसेच रास्ता रोको आंदोलन केले.
दुपारी बारा वाजता कॉँग्रेस भवन येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. नोटाबंदीमुळे सामान्य जनतेला कसा त्रास झाला याचे फलक व हातात कॉँग्रेसचा ध्वज घेऊन निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. सांगली बॅँक कॉर्नर, टिळकपथ, शालिमार चौक, शिवाजी रोडवरून जुने मध्यवर्ती बस स्थानक चौकातून मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडविण्यात आला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणा बाजी करून रस्त्यावरच ठाण मांडून रास्ता रोको केला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाल्याने पोलिसांची धावपळ उडाली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना नोटाबंदीवरून प्रश्नांची सरबत्ती केली. जिल्ह्यात किती नोटा जमा झाल्या व किती वाटल्या याचा हिशेब जनतेला द्या, अशी मागणीही यावेळी लावून धरण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सहारा व बिरला ग्रुपकडून मोदी यांनी काळा पैसा घेतला असून, नोटाबंदीतून भारतात सगळ्यात मोठा घोटाळा केंद्र सरकारने केला आहे. नोटाबंदीतून भाजपा व रा. स्व. संघाने करोडो रुपयांची संपत्ती खरेदी केली असून, या साऱ्या प्रकाराची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे. या मोर्चात आमदार के. सी. पाडवी, निर्मला गावित, डॉ. शोभा बच्छाव, शरद अहेर, राजाराम पानगव्हाणे, कमलेश चौधरी, अविनाश रामिष्टे, हेमलता पाटील, शाहू खैरे, शिरीष कोतवाल, उत्तमराव कांबळे, तुषार शेवाळे, वत्सला खैरे, अनिल अहेर, ममता पाटील, प्रताप पाटील, लक्ष्मण जायभावे, राजेंद्र बागुल, आर. आर. पाटील, रमेश जाधव आदिंसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.