‘आशुरा’च्या निमित्ताने नमाजपठणासाठी गर्दी

By Admin | Updated: October 24, 2015 23:56 IST2015-10-24T23:55:26+5:302015-10-24T23:56:23+5:30

‘इमामशाही’त भाविकांची रीघ : ताबुतांची मिरवणूक; मुहर्रमच्या प्रवचनमालांचा समारोप

Congratulation for prayers on 'Ashura' | ‘आशुरा’च्या निमित्ताने नमाजपठणासाठी गर्दी

‘आशुरा’च्या निमित्ताने नमाजपठणासाठी गर्दी

नाशिक : मुहर्रमचा दहावा दिवस शनिवारी (दि.२५) शहरात समाजबांधवांकडून ‘यौमे आशुरा’चा दिन म्हणून पाळण्यात आला. यानिमित्त ठिकठिकाणी दुधापासून बनविलेल्या शेकडो लिटर सरबताचे वाटप करण्यात आले. संध्याकाळी जुन्या नाशकातून ताबुतांची मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, समाजबांधवांनी मशिदींमध्ये सकाळी विशेष नमाजपठणाठी गर्दी केली होती. यावेळी ‘आशुरा’ची खास प्रार्थना करण्यात आली. बहुतांश समाजबांधवांनी दोन दिवसीय उपवास (रोजा) केले.
चौक मंडई येथून संध्याकाळी पाच वाजता ताबुतांची पारंपरिक मिरवणूक काढण्यात आली. यावर्षी अवघ्या दोन ताबुतांचा समावेश होता. काझीपुरा, आदमशाह बाबा चौकातून पिंजारघाट रस्ता, शहीद अब्दुल हमीद चौक, भद्रकाली भाजीबाजार, मेनरोड, धुमाळ पॉइंट, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅन्डवरून दोन्ही ताबूत गोदाघाटावर पोहचले तेथे ताबूत विसर्जित करण्यात आले. सारडा सर्कलवरील इमामशाही दर्गाच्या आवारात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली होती.
मुहर्रम महिन्यात प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांचे नातू शहीद-ए-आझम हजरत इमाम हुसेन व त्यांचे कुटुंबीयांनी मानवता व सत्यवादी तत्त्वांच्या संरक्षणार्थ करबलाच्या रणांगणावर बलिदान दिले. करबलाच्या शहिदांच्या स्मरणार्थ मुहर्रम महिन्याच्या एक तारखेपासून दहा तारखेपर्यंत प्रवचनमालांचे शहरात आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून धर्मगुरूंनी करबलाच्या युद्धाचा इतिहास, कारण आणि त्यामागचा उद्देश आदि बाबींवर प्रकाश टाकला. (प्रतिनिधी)

Web Title: Congratulation for prayers on 'Ashura'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.