कुंभमेळा निधीसाठी गडकरींना साकडे
By Admin | Updated: July 26, 2014 00:49 IST2014-07-26T00:43:31+5:302014-07-26T00:49:32+5:30
महापौरांनी दिले निवेदन : लवकरच निर्णय होणार

कुंभमेळा निधीसाठी गडकरींना साकडे
नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्र शासनाने अलाहाबाद आणि नांदेड शहराला केलेल्या आर्थिक मदतीनुसार नाशिकसाठीही भरघोस निधी द्यावा, यासाठी महापौर अॅड. यतिन वाघ यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले. दिल्लीत या विषयावर चर्चा करून लवकरच कळवू, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यात नाशिक महापालिकेचा आराखडा १०५२ कोटी रुपयांचा आहे. कुंभमेळ्याकरिता २४०० कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तथापि, अद्याप निधी मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर महापौर अॅड. यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी गडकरी यांना निवेदन दिले. २००३-०४ यावर्षी झालेल्या कुंभमेळ्यास दीड लाख साधू-महंत, तर २५ ते ३० लाख भाविक नाशिकमध्ये आले होते. आता तीन लाख साधू-महंत आणि एक कोटीहून अधिक भाविक पर्वणीच्या दिवशी येण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाने अलाहाबाद येथे कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांचा निधी दिला होता, तर नांदेड येथे गुरू दा गद्दी सोहळ्यासाठी ९०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेला कुंभमेळ्याकरिता जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, बाळासाहेब सानप, सभागृह नेता शशिकांत जाधव, गटनेता अशोक सातभाई, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)