ध्वजारोहण, निकालाविषयी शाळांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:18 IST2021-04-30T04:18:55+5:302021-04-30T04:18:55+5:30
नाशिक : जिल्ह्यातील शाळांमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करून निकाल जाहीर करण्याची परंपरा आहे. मात्र यावर्षी ...

ध्वजारोहण, निकालाविषयी शाळांमध्ये संभ्रम
नाशिक : जिल्ह्यातील शाळांमध्ये १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करून निकाल जाहीर करण्याची परंपरा आहे. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये ध्वजारोहण आणि निकालांची घोषणा करण्यासंदर्भात शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने यासंदर्भात शाळांना मार्गदर्शक सूचना करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षी शाळांमध्ये एकत्रित ध्वजारोहण व निकाल जाहीर करण्याची परंपरा खंडित झाली होती. त्यासंदर्भात शिक्षण विभागाने स्पष्ट आदेश संबंधित शाळांना काढले होते. मात्र यावर्षी अद्याप मुख्याध्यापक अथवा शाळांना अशा प्रकारच्या कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत, शिक्षण विभागाने शासन निर्णय जाहीर करून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करण्याचा निर्णय़ जाहीर केला. त्याचप्रमाणे नववी, अकरावीच्या परीक्षाही रद्द करू असाच निर्णय घेण्यात आला. कोरोनाचे संकट वाढल्याने दहावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या असून, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेशित करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यासाठी गुणपत्रक तयार करण्यासाठी मार्गदर्शक सूचनाही करण्यात आल्या; मात्र या सर्व वर्गांचे निकाल केव्हा जाहीर करायचे याविषयी कोणत्याही स्पष्ट सूचना शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षकांमध्ये संभ्रम असून शासनाने यासंदर्भात स्पष्ट सूचना करण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने देशात ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे या कालावधीत घरातून बाहेर पडण्यास अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी, नागरिक यांच्याव्यतिरिक्त सर्वांना मनाई आहे. मनाई असलेल्यांमध्ये शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी व पालक-ग्रामस्थ यांचा समावेश आहे.
कोट-
कोरोनामुळे गेल्या वर्षी शाळांमध्ये एकत्रित ध्वजारोहण व निकाल जाहीर करू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाने केल्या होत्या. मात्र यावर्षी अद्याप अशा कोणत्याही सूचना शाळांना अथवा मुख्याध्यापकांना प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळांचा याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.
- राजेंद्र निकम, मुख्याध्यापक, सागरमल मोदी विद्यालय
शासन निर्णयानुसार जिल्ह्यात केवळ विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण होणार असल्याचे शासनाने स्पष्ट केेले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे संभ्रम असण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे निकालासंदर्भात शिक्षण विभागाकडून अद्याप कोणतीही सूचना प्राप्त नाही. शाळांनी प्राप्त सूचनांनुसार कार्यवाही करावी.
- राजीव म्हसकर, शिक्षणाधिकारी