भ्रम-वास्तवाचा प्रवास : अरण्यभूल
By Admin | Updated: December 1, 2015 23:43 IST2015-12-01T23:42:25+5:302015-12-01T23:43:20+5:30
राज्य नाट्य : ओझर ‘एचएएल’च्या वतीने सादरीकरण

भ्रम-वास्तवाचा प्रवास : अरण्यभूल
नाशिक : ‘अरण्यभूल’ पडल्यासारखे सैरावैरा धावत सुटणाऱ्या डॉन या व्यक्तीची भ्रम आणि वास्तवाच्या प्रवासाची कथा ‘अरण्यभूल’ नाटकातून सादर करण्यात आली.
हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या एचएईडब्ल्यूआरसीच्या वतीने आज हा प्रयोग झाला. डॉन क्विक्झोट हा जगातून हद्दपार होत चाललेली जीवनमूल्ये पुन्हा प्रस्थापित करण्याच्या हेतूने प्रवासाला निघतो. त्याला जगातल्या वाईट गोष्टी नष्ट करून जगाला न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यासाठी तो सॅँको पान्झा नावाच्या साध्या शेतकऱ्याला सोबतीला घेतो; पण तो प्रत्येक आघाडीवर पराभूत होऊन परत येतो आणि तेथून नाटकाचा प्रवास सुरू होतो. लक्ष्मीकांत खैरनार निर्मित या नाटकाचे लेखन प्रा. रमेश कोटस्थाने यांचे, तर दिग्दर्शन विजय जगताप यांचे होते. रितेश गायकवाड, चारुदत्त हिरे, भाऊसाहेब साळवे, योगेश बागुल, दीपक सूर्यवंशी, सुमन शर्मा, अनुप खैरनार यांच्या भूमिका होत्या. गोपाल भगत यांनी सूत्रधाराची जबाबादारी सांभाळली. प्रकाशयोजना रवि रहाणे, विलास चव्हाण, वेशभूषा लीना सोनार, धनश्री भार्गवे, संगीत रोहित सरोदे, विकास शिंदे, नेपथ्य विजय घोरण, रंगभूषा माणिक कानडे यांची होती.
आजचे नाटक
बायको पाहावी सांभाळून
(गिरिधरलीला प्रॉडक्शन, नाशिक)