वाढीव वीजबिलामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम
By Admin | Updated: February 4, 2017 23:50 IST2017-02-04T23:50:32+5:302017-02-04T23:50:54+5:30
वीज वितरण : घरगुती ग्राहकांसाठी केवळ दीड टक्का वाढ केल्याचा दावा

वाढीव वीजबिलामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम
येवला : वीज वितरण कंपनीने नोव्हेंबरपासून आकारलेला वीजवहन आकार डिसेंबरच्या वीजबिलात वेगळा दाखवला गेल्याने बिलात थेट ३५ ते ४० टक्के दरवाढ झाल्याचा समज ग्राहकांचा झाल्याने अनेकांनी मांडलेल्या गाऱ्हाण्यांचा शोध घेतला असता वीज वितरण कंपनीने घरगुती वीज वापरासाठी केवळ दीड टक्का वाढ केल्याचे मान्य केले. परंतु अन्य ग्राहकांसाठी किती वाढ झाली हे समजू शकले नाही. असे असले तरी वीज दरवाढ मनमानी पद्धतीने होत असल्याचा आरोप अनेक ग्राहकांनी केला आहे.
या महीन्यात आलेल्या वीज बिलाचे बारकाईने वाचन केले तर डिसेंबर महीन्यापासून नवीन एका वहन आकाराची बिलात भर टाकली गेली आहे. १ युनिट वीज वापरला १.१८ रु पये असा हा वाढीचा दर दिसत आहे. म्हणजेच मगील बीलाच्या एकूण ३५ ते ४० टक्के वाढ झाल्याचे वरकरणी स्पष्ट दिसत आहे. विज वितरण कंपनीने अचानक एक आकार वाढवून सामान्य विज ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली काय ?अशी विचारणा अनेकांनी केली. ठराविक अंतराने नवीन आकारात भरच पडत असल्याचा अनुभव ग्राहक घेत आहे. वीज बिल वाढ अपरिहार्य असली तरी ,वीज वितरण कंपनीकडून अखंडित सेवा मिळावी अशी अपेक्षा ग्राहक करीत आहे. येवला शहर आणि येवला ग्रामीण असे वीज वितरण कंपनीचे दोन भाग आहेत.
जानेवारी महीन्यापासून वीजबिलात वहन आकाराचा नव्याने समावेश करून प्रतियुनिट १रु पया १८ पैसे वीज दरवाढ केल्याचा संदेशही सध्या सोशल मिडियावर फिरत असून तो चुकीचा व वीजग्राहकांची दिशाभूल करणारा असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. राज्य विद्युत नियामक आयोगाने प्रथमच वीजदरातील अस्थिर आकारांची विभागणी केल्याने वहन आकार स्वतंत्रपणे दाखिवण्यात आला आहे. वीजदर निश्चित करण्याचे अधिकार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाला आहेत. त्यामुळे महावितरण वीजदर ठरवू शकत नाही किंवा बदल करु शकत नाही. २६ जून २०१५ च्या वीजदर आदेशापर्यंत वीजबिलात स्थिर आकार व अस्थिर आकार अशा दोन भागांतच आकारणी होत असे. ३ नोव्हेंबर २०१६ च्या आयोगाच्या आदेशानुसार आता वीजबिलांत स्थिर आकार, वीज आकार व वहन आकार अशा तीन भागांत आकारणी केली जात आहे. यापैकी वीज आकार व वहन आकार हे पूर्वीच्याच अस्थिर आकाराचे दोन भाग आहेत. सदर बाबींचा विचार करता वहन आकारामुळे ३५ ते ४० टक्के वीज दरवाढ झालेली नाही. विद्युत नियामक आयोगाच्या प्रसिध्दीपत्रका-प्रमाणे घरगुती ग्राहकांच्या वीजदरात केवळ सरासरी १.३ टक्के इतकीच वाढ झालेली आहे. हे दर १ नोव्हेंबर २०१६ पासून लागू असून नव्या वीजदरात वहन आकार प्रथमच वेगळा दाखवला आहे.
पहील्या १०० युनिटसाठी असलेला घरगुती वीजदर पाहिल्यास वीज आकार २.९८ रु पये अधिक वहन आकार १.१८ रु पये असा एकूण ४.१६ रु पये अस्थिर वीज आकार आहे. यातील वहन आकार नवीन नाही तो वीजदराचाच एक भाग आहे. त्यामुळे वहन आकाराच्या नावाखाली दरवाढ केल्याचा सोशल मिडियातून फिरणारा संदेश चुकीचा असून वीजग्राहकांना संभ्रमीत करणारा असल्याचे वीज वितरणने सांगितले.