शाळांच्या सुट्यांबाबत संभ्रम
By Admin | Updated: August 9, 2015 22:34 IST2015-08-09T22:33:24+5:302015-08-09T22:34:32+5:30
इंग्रजी माध्यमांना सुटी : महापालिका शाळांबाबत आज निर्णय

शाळांच्या सुट्यांबाबत संभ्रम
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात आखाड्यांचे ध्वजारोहण व पाठोपाठ येणाऱ्या शाही पर्वणीच्या काळात शहर व परिसरातील शाळा, महाविद्यालये सुरू वा बंद ठेवण्याबाबत प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून, शहरातील मराठी माध्यमांच्या शाळांबाबत महापालिका शिक्षण मंडळ निर्णय घेईल, अशी भूमिका जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली आहे, तर इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी ‘कुंभमेळा हॉलीडे’ म्हणून आपल्या अखत्यारित शाळांना सुट्याही जाहीर केल्याने पालकवर्ग आणखीनच संभ्रमित झाला आहे.
नाशिक शहर व परिसर शैक्षणिक हब म्हणून ओळखला जाऊ लागला असून, शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या गावांमधूनही हजारो विद्यार्थी आता ज्ञानार्जनासाठी नाशिक शहरात येऊ लागले आहेत, त्यांच्या वाहतुकीची काही संस्थांनी स्वतंत्र व्यवस्था, तर काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतात. परंतु कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आत्तापासूनच शहरातील विविध रस्त्यांचा फास आवळण्यास सुरुवात केल्यामुळे प्रत्यक्ष पर्वणी काळात व दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या आखाड्यांच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या दिवशी शहरांतर्गत व बाह्य वाहतूक व्यवस्था सुरू असेल की बंद याविषयी कोणताही सुस्पष्ट उलगडा अद्यापही होऊ शकलेला नाही, परिणामी शाळा व महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय शाळा व संस्थाचालकही घेऊ शकलेले नाहीत. मात्र शहरातील रस्तेच बंद ठेवण्याचे पोलिसांचे प्रयोजन आहे असेच चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने पाल्यांना शाळेत पाठवावे की नाही अशा संभ्रमात पालक सापडले आहेत.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करणाऱ्या शासकीय यंत्रणेच्या मते गत सिंहस्थात फक्त पर्वणीच्या दिवशीच शाळांना सुटी देण्यात आली होती, यंदाही तसेच नियोजन असेल असे मोघम उत्तर देण्यात आले, तर मध्यंतरीच्या काळात विभागीय आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवून शैक्षणिक सुट्यांच्या दिवसांची यादीही मागविली होती, त्या यादीच्या आधारे सुट्या दिल्या जाऊ शकतात असा अंदाज बांधला जात आहे. प्रत्यक्षात अद्यापही त्यावर अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे शहरातील होरायझन, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या शाळांना ध्वजारोहणाच्या दिवशी म्हणजेच १९ आॅगस्ट रोजी सुटी जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ही सुटी समाजदिनानिमित्त देण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांनी दिली. शहरातील अन्य शाळांबाबतही संभ्रम असून, बहुतांशी शाळाचालकांनी शासनाच्या आदेशान्वये शाळांना सुट्या दिल्या जातील, असे जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)