तलाठी व लिपिक संवर्गात संघर्षाचा भडका उडण्याची चिन्हे
By Admin | Updated: November 23, 2014 01:02 IST2014-11-23T01:01:43+5:302014-11-23T01:02:07+5:30
तलाठी व लिपिक संवर्गात संघर्षाचा भडका उडण्याची चिन्हे

तलाठी व लिपिक संवर्गात संघर्षाचा भडका उडण्याची चिन्हे
नाशिक : महसूल विभागात विळ्या-भोपळ्याचे नाते असलेल्या तलाठी व लिपिक संवर्गात संघर्षाचा भडका उडण्याची चिन्हे दिसू लागली असून, तलाठी संवर्गासाठी राखीव असलेली पदे लिपिक संवर्गातून भरण्याबरोबरच, पदोन्नतीतही लिपिकांनी तलाठ्यांना मागे सारून महत्त्वाची टेबल बळकविल्याने जिल्ह्यातील तलाठ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात ज्याच्या हाती तलाठी व लिपिकाच्या आस्थापनेचे काम सोपविण्यात आलेले आहे, त्याने स्वत:ची पदोन्नती व राखीव पदावर वर्णी लावून घेतल्याची बाब, तर समस्त तलाठ्यांच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे.
या संदर्भात तलाठी संघटनेने थेट आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले असून, तेथूनही न्याय न मिळाल्यास आंदोलनाची तलवार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या मते चालू वर्षी मंडळ अधिकारी संवर्गातील २७ पदे सेवानिवृत्तीने रिक्त होत असताना प्रशासनाने निवड यादी करताना १५ तलाठी संवर्गाची निवड केली आहे. मुळात प्रशासनाने ५६ पदे निवड करणे आवश्यक असताना फक्त ४४ पदे निवड केल्याने तलाठी संवर्गातील १२ कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित राहावे लागले आहे. तलाठी संवर्गातील रिक्त असलेल्या पदांवर लिपिक संवर्गाने भरून त्यांना पदोन्नतीसाठी प्राधान्य देण्यात आल्याचे तलाठ्यांचे म्हणणे आहे. एवढेच नव्हे, तर लिपिक संवर्गातून अव्वल कारकून संवर्गात पदोन्नतीने देण्यासाठी आकृतीबंधानुसार २१८ पदे आहेत, परंतु जिल्ह्यात लिपिक संवर्गातून २२६ पदे भरण्यात आलेली असून, तलाठी संवर्गातील आठ पदे लिपिक संवर्गातून भरण्यात आले आहेत. त्यात आस्थापना शाखेतील मोंढे नामक लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्याने स्वत:च बेकायदेशीररीत्या तलाठी संवर्गातून पदोन्नती घेतली आहे. या कामी मोंढे यांना आस्थापना शाखेतीलच अव्वल कारकून श्रीमती वैद्य यांनी मदत केली असल्याने या दोन्हींची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तलाठी संघटनेने केली आहे. २०१२-१३ ची कालबद्ध पदोन्नतीची बैठकही अद्याप न झाल्याने तलाठ्यांची तगमग वाढली आहे. आस्थापना शाखेतील कर्मचाऱ्यांकडून तलाठी संवर्गाला सापत्नवागणूक दिली जात असून, संबंधित कर्मचाऱ्यांची तातडीने चौकशी न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)