प्रशिक्षणाच्या तारखांवरून सदस्य-प्रशासनात संघर्ष
By Admin | Updated: July 1, 2017 23:48 IST2017-07-01T23:47:43+5:302017-07-01T23:48:42+5:30
जिल्हा परिषद : डझनभर सदस्य आमसभेला मुकणार?

प्रशिक्षणाच्या तारखांवरून सदस्य-प्रशासनात संघर्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या ५ जुलैला होत असून, त्या सभेच्या बरोबर एक दिवस आधीपासून सलग तीन दिवसांच्या यशदा येथील प्रशिक्षणावरून जिल्हा परिषद सदस्य व प्रशासन यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. आम्हाला प्रशिक्षणही महत्त्वाचे आणि सर्वसाधारण सभाही महत्त्वाची. मग तारखा एकच का घेतल्या, यावरून सदस्य संघर्षाच्या पावित्र्यात आहे.
यशदा येथे ४ ते ६ जुलै दरम्यान सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ व देवळा या तालुक्यातील रूपांजली माळेकर, शोभा डगळे, रमेश बरफ, ज्योती जाधव, कलावती चव्हाण, अनिता बोडके, नूतन अहेर, धनश्री अहेर, यशवंत शिरसाट, भास्कर गावित, हेमलता गावित या ११ जिल्हा परिषद सदस्य व ज्योती राऊत, सुवर्णा गांगोडे, केसरबाई अहिरे, पुष्पा गवळी या चार पंचायत समिती सभापती अशा एकूण १५ लोकप्रतिनिधींची पुणे येथील यशदाच्या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. मात्र ५ जुलैला जिल्हा परिषदेची आमसभा बोलविण्यात आल्याने या सदस्यांनी प्रशिक्षणासाठी पुण्याला जाण्यास नकार दिला आहे. कारण सदस्यांच्या दृष्टीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तीन महिन्यांतून एकदाच बोलविण्यात येणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित राहणे महत्त्वाचे आहे. तसेच पंचायत राज कारभार समजून घेण्यासाठी यशदा येथील प्रशिक्षणास उपस्थिती लावणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे सदस्यांनी हा प्रशिक्षण कालावधी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.अध्यक्षांवर फोडले खापरप्रशासनाने प्रशिक्षण आणि आमसभा यांच्या तारखांतील गोंधळाचे खापर जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यावर फोडत आधी प्रशिक्षणासाठी तारीख निश्चित असताना नंतर अध्यक्षांनी आमसभेची तारीख निश्चित केल्याचे स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे तर आमसभेऐवजी या ११ जिल्हा परिषद सदस्य व चार पंचायत समिती सभापतींना पुण्याला पाठविण्यासाठी हिरवा कंदील दाखविल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आधीच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात सुरू असलेला छुपा संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहे.