आयुर्वेदाच्या संघटनांमध्येच मतभिन्नता
By Admin | Updated: February 6, 2016 00:39 IST2016-02-06T00:09:27+5:302016-02-06T00:39:58+5:30
बैठकीचे सस्पेन्स : चर्चेबाबत मात्र एकवाक्यताच नाही

आयुर्वेदाच्या संघटनांमध्येच मतभिन्नता
नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे विभाजन करून नागपूरला आयुष विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या समितीमध्येच समन्वयाचा अभाव असून येत्या ९ रोजी होणाऱ्या बैठकीबाबत परस्परविरोधी विधाने केली जात आहेत. शुक्रवारपर्यंत अशी कोणतीही बैठक नसल्याचे सांगणारे सभासद नऊ रोजीची बैठक मुंबईत होणार असल्याचे सांगत आहेत, तर त्या बैठकीत विद्यापीठाचा विषय नसल्याचेही काही सदस्य सांगत आहेत.
आयुष संचालनालयाने आयुष विद्यापीठासाठी जागेचा शोध घेण्याची जबाबदारी ज्या समितीवर सोपविली होती त्या समितीची बैठक आयुष विभाग घेणार असल्याची चर्चा सुरुवातीला होती. ४ तारखेला बैठक नागपूरला होण्याची चर्चा चांगलीच रंगली होती; मात्र अशी कोणतीही बैठक आयुष विभागाने घेतलीच नाही. त्यानंतर ६ तारखेला बैठक होणार असल्याचे समितीच्या सदस्यांचे म्हणणे होते. सहा तारीखही उलटून गेली असून बैठकीबाबत कुणीही दुजोरा दिला नाही. या संदर्भात आयुष संचालनालयाचे संचालक डॉ. कुलदीपसिंग कोहोली यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
आयुर्वेदाच्या डॉक्टरांची बैठक नेमकी कोण घेणार आणि कोणत्या विषयावर याबाबतचा सस्पेन्स मात्र कायम आहे. येत्या ९ तारखेला मुंबईत होणारी बैठक वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोलविली असून या बैठकीबाबतही आयुर्वेदाच्या संघटना ठामपणे सांगत नसल्याने नेमकी बैठक कशा संदर्भात आहे याविषयीचा उलगडा होऊ शकलेला नाही. शिक्षणमंत्र्यांनी बोलविलेल्या बैठकीस समितीला आमंत्रण नसल्याचेही समजते. त्यामुळे मुंबईत ९ तारखेला होणाऱ्या बैठकीचेही महत्त्व वाढले आहे. (प्रतिनिधी)