नाशिक : सत्ताधारी प्रगती पॅनलने विद्यमान सात संचालकांचे पत्ते कापल्याने त्यांच्यात असलेल्या नाराजीचा फायदा उचलण्यासाठी विरोधी समाज विकास पॅनलने व्यूहरचना आखली आहे. या व्यूहरचनेनुसार येवला, नांदगाव व सिन्नर तालुक्यांतील नाराजांच्या भेटीगाठी घेण्याची तयारी समाज विकासने केली आहे.याच भेटीचा एक भाग म्हणून विरोधी समाज विकास पॅनलचे पदाधिकारी गुरुवारी चांदवडला जाणार होते. मात्र उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवसाचा गोंधळ व जमवाजमव करण्यात वेळ लागल्याने हे पदाधिकारी शुक्रवारी (दि.४) चांदवडला गेल्याची चर्चा होती. सत्ताधारी प्रगती पॅनलकडून यंदाच्या निवडणुकीत अनेक विद्यमान संचालकांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आल्याने या इच्छुकांमध्ये उघड उघड नसली तरी सुप्त नाराजी आहे. त्याच नाराजीचा फायदा घेण्याची खेळी आता समाज विकास पॅनलने तयारी केली आहे. या नाराजांच्या भेटी घेऊन त्यांचे हक्काचे मतदार समाज विकास पॅनलकडे वळविण्याबाबत व्यूहरचना आखून त्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याचे समजते. सत्ताधारी पॅनलने अनुभवी असलेल्या विद्यमान संचालकांचे पत्ते कापल्याने त्यामागे वेगळीच चर्चा आहे. हे अनुभवी संचालक भविष्यात जड होऊ नये, म्हणूनच त्यांचे पत्ते कापल्याचे हे माजी संचालक खासगीत बोलताना सांगतात. एका माजी संचालकाला तर तीन वर्षांपूर्वीच आपला पत्ता कापला जाणार असल्याचे एका शिक्षकाने कानगोष्टीत सांगितले होते. तेव्हा या संचालकाला त्यात फारसे गांभीर्य वाटले नाही. मात्र आता उमेदवारी कापली गेल्यानंतर या माजी संचालकाला या तीन वर्षांपूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली. वर्षानुवर्षे पवार कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहणाºया एका ज्येष्ठ माजी संचालकांलाचाही पत्ता कापला गेल्याने या माजी संचालकांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे समजते. एकनिष्ठतेचे हेच फळ आपल्याला मिळाले काय? अशी भावना या संचालकात असल्याची चर्चा आहे.