आपत्ती व्यवस्थापनासाठी पथकांची निश्चिती

By Admin | Updated: March 29, 2015 00:45 IST2015-03-29T00:41:16+5:302015-03-29T00:45:36+5:30

कुंभमेळा : ६ एप्रिलपासून पथकांचे प्रशिक्षण

Confirmation of squad for disaster management | आपत्ती व्यवस्थापनासाठी पथकांची निश्चिती

आपत्ती व्यवस्थापनासाठी पथकांची निश्चिती

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात संभाव्य आपत्तीचे निराकरण करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांतर्गत शोध व बचाव पथकांची निश्चिती करण्यात आली असून, शनिवारी त्या संदर्भात बैठक होऊन पथकात सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम घोषित करण्यात आला.
कुंभमेळ्यात तीन शोध व बचाव पथके कार्यरत राहणार असून, या पथकांना आवश्यक असलेले प्रशिक्षण एनडीआरएफ मार्फत देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रशिक्षकांचे प्रशिक्षण होणार असून, ते इतर पथकांना प्रशिक्षण देतील. प्रत्येक पथकात अग्निशमन दलाचे बारा, पोलीस विभागाचे बारा, पाच होमगार्ड, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी पाच, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दोन, नायब तहसीलदार दोन आणि महानगरपालिका आणि नगरपालिका प्रशासनाचा प्रत्येकी एक सदस्य अशा प्रकारे ४० सदस्यांचा समावेश असेल. या पथकाला विविध आपत्तींना सक्षमपणे सामोरे जाण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरविण्यात आले. या प्रशिक्षणाशिवाय रेडक्रॉस संस्थेमार्फत संदर्भ सेवा रुग्णालय येथे दहा पथकांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यात प्रत्येक पथकात ५० सदस्यांचा समावेश असेल, या पथकांमध्ये प्रामुख्याने एनसीसी, एनएसएस आणि पोलीस जवानांचा समावेश करण्यात येणार आहे.
मेडिकल फर्स्ट रेस्पॉँडर म्हणून आरोग्य विभागाच्या चार पथकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात ५० प्रशिक्षणार्थींचा समावेश असेल. नर्सिंग महाविद्यालयाच्या सभागृहात हे प्रशिक्षण देण्यात येईल या शिवाय टप्पाटप्प्याने पाणीपुरवठा, स्वच्छता व आरोग्य, संचार व संवाद, विद्युतपुरवठा, रिलीप कॅम्प आदि विविध बाबींचे प्रशिक्षणही तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत देण्यात येणार आहे. महसूल, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा, महावितरण, असे सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित सर्व यंत्रणांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना या प्रशिक्षणात सहभागी करून घेण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणासाठी विविध विभागांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत केलेल्या सूक्ष्म नियोजनाची माहिती एकत्रित करण्यात येत असून, त्या आधारे एकत्रित नियोजन करण्यात येणार आहे. त्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. बैठकीस जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, सहायक पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, यशदाचे कर्नल विश्वास सुपणेकर, एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट सच्चिदानंद गावडे, उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उदय किसवे, सह निबंधक रमेश काळे, आरोग्य उपसंचालक डॉ. डी. बी. पवार, पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे आदि उपस्थित होते. प्रशिक्षण देण्यापूर्वी एनडीआरएफचे प्रशिक्षण देणारे अधिकारी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील महत्त्वाच्या ठिकाणी भेट देणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Confirmation of squad for disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.