सतरा नंबरसाठी आता पाचवी पासची अट
By Admin | Updated: July 30, 2016 23:27 IST2016-07-30T23:26:20+5:302016-07-30T23:27:42+5:30
सतरा नंबरसाठी आता पाचवी पासची अट

सतरा नंबरसाठी आता पाचवी पासची अट
पेठ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या खासगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) भरून परीक्षा देण्याची किमान शैक्षणिक पात्रता चौथीऐवजी पाचवी पास करण्यात आली असून, सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून नवीन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
विविध कारणांमुळे मध्येच शाळा सोडून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडलेल्या व शालेय शिक्षणात खंड पडलेल्या मुलांसाठी शिक्षण मंडळाकडून किमान चौथी उत्तीर्ण असणाऱ्यांना फॉर्म नं. १७ भरून दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होता येत होते; मात्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण कायदा २००९द्वारे प्राथमिक स्तर पहिली ते पाचवी आणि उच्च प्राथमिक स्तर सहावी ते आठवी असा करण्यात आल्याने विशेष नोंदणी करून परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याची किमान शैक्षणिक पात्रताही पाचवी उत्तीर्ण करण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षापासून नवीन नियम लागू करण्यात येणार असल्याचा शासननिर्णय पारित करण्यात आला आहे. (वार्ताहर)