सुरगाण्यातील रस्त्याचे कॉंक्रिटीकरण रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 00:57 IST2021-06-16T23:56:48+5:302021-06-17T00:57:06+5:30
सुरगाणा : गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेले कॉंक्रिट रस्त्याचे काम वारंवार मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्यावरच उपोषण करण्याचा इशारा येथील भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

अपना बेकरी ते होळी चौकदरम्यान रखडलेला रस्त्यासंदर्भात तहसीलदार किशोर मराठे यांना निवेदन देताना सचिन महाले, भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, दिनकर पिंगळे, भावडू चौधरी आदी.
सुरगाणा : गेल्या पाच महिन्यांपासून रखडलेले कॉंक्रिट रस्त्याचे काम वारंवार मागणी करूनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याने या रस्त्यावरच उपोषण करण्याचा इशारा येथील भाजपचे युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन महाले यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
दुसरे लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी शहराचे प्रवेशद्वार म्हणून असलेल्या होळी चौक ते अपना बेकरी असलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. कॉंक्रिटीकरण असलेल्या या रस्त्याचे काम अंदाजपत्रकाप्रमाणे सुरुवात करणे आवश्यक होते. मात्र या ठिकाणी आणून टाकलेली खडी निकृष्ट दर्जाची असून, या रस्त्याचे काम सुरू होऊ शकलेले नाही.
आउटलाइन न करता रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेले गटारीचे काही पाइप फुटले आहेत. परिणामी उताराच्या बाजूने असलेल्या घरांमध्ये गटारीचे पाणी घुसण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हे काम रखडले आहे. दोन-तीन महिन्यांपूर्वी संबंधित ठेकेदाराने बारा दिवसांत रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु रस्त्याचे काम झाले नाही. वार्ड क्रमांक १ व २ मधील रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. सर्वच रस्ते कामांची गुणवत्ता नियंत्रण मार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष रमेश थोरात, भावडू चौधरी,बाळकृष्ण सूर्यवंशी, छोटूशेठ दवंडे, कैलास सूर्यवंशी, संजय पवार, योगेश चव्हाण, दिनकर पिंगळे आदी उपस्थित होते.
शहरला गढूळ पाणीपुरवठा
शहरात पिण्यासाठी गढूळ पाण्याचा नळाद्वारे पुरवठा केला जात असून, स्वच्छ पाणी देण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. येत्या चार-पाच दिवसांत पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा न केल्यास २२ जूनपासून आंदोलन छेडण्याचा इशारा तहसीलदार किशोर मराठे यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.