‘देवगांधार’ संगीत सोहळ्याचा समारोप
By Admin | Updated: January 23, 2017 00:17 IST2017-01-23T00:17:39+5:302017-01-23T00:17:57+5:30
देव जन्मशताब्दी : अलकाताई मारूळकर यांचे शास्त्रीय गायन

‘देवगांधार’ संगीत सोहळ्याचा समारोप
नाशिक : ललित पंचम राग, ठुमरी आणि बाबुलमोराच्या सुमधूर गीतांच्या सादरीकरणाने गायिका अलकादेव यांनी शास्त्रीय संगीताच्या मैफलीत रंग भरले आणि सुश्राव्य गीतांच्या सुरावटीने सजलेल्या सोहळ्याची संगीतमय सांगता झाली.
पंडित राजाभाऊ देव यांचे जन्मशताब्दी वर्ष आणि पुण्यस्मृतिप्रीत्यर्थ ‘देवगांधार २०१७’ या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसीय या सोहळ्याची रविवारी सांगता झाली. देवगांधार-२०१७ या संगीत सोहळ्याचे द्वितीय पुष्प रविवारी गायिका अलकाताई देव- मारुलकर यांनी गुंफले. रावसाहेब थोरात सभागृहात झालेल्या या संगीतप्रधान कार्यक्रमात रसिकांनी गर्दी केली होती. ज्येष्ठ गायिका अलकाताई देव-मारुलकर यांच्या शास्त्रीय गायनाने भारावलेल्या संगीतमय वातावरणात रसिकश्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. राग सौराष्ट्रभैरवने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ललितपंचम, व त्यानंतर भैरवीतील ठुमरी बाबुलमोरा गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. यावेळी नाशिकमधील संगीत क्षेत्रातील गुरूजन, गुणीजन आणि संगीतसाधक, संगीतप्रेमी उपस्थित होते. अलकातार्इंना तबलावादक संजय देशपांडे, संवादिनीवर ईश्वरी दसककर, सुभाष दसककर यांनी साथसंगत केली. तानपुरा आणि स्वरसाथ स्वराली पणशीकर, रजिंदर कौर, कल्याणी दसककर यांनी साथसंगत केली. यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.