आॅनलाइन कर भरणाऱ्यांनाही सवलत
By Admin | Updated: October 12, 2016 22:26 IST2016-10-12T22:23:16+5:302016-10-12T22:26:21+5:30
महापालिका : पुढील बिलात रक्कम समायोजित

आॅनलाइन कर भरणाऱ्यांनाही सवलत
नाशिक : महापालिकेने येत्या १ नोव्हेंबरपासून आॅनलाइन घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्या करदात्यांसाठी सवलत योजना जाहीर केली असतानाच एप्रिल २०१६ पासून ते आतापावेतो आॅनलाइन करभरणा करणाऱ्यांनाही सवलत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधित करदात्यांच्या पुढील आर्थिक वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टीच्या बिलात सदर सवलतीची रक्कम समायोजित केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण व उपआयुक्त रोहिदास दोरकूळकर यांनी पत्रकार परिषदेत आॅनलाइन करभरणा सवलत योजनेची माहिती दिली. आॅनलाइनद्वारे करभरणा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आॅनलाइन भरणा केल्यास घरपट्टीच्या बिलात १ टक्का किंवा जास्तीत जास्त ५०० रुपयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. तसेच पाणीपट्टीचा भरणा केल्यास आर्थिक वर्षात दीड टक्का किंवा जास्तीत जास्त १०० रुपयांपर्यंत सवलत दिली जाणार आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून सदर सवलत योजना लागू केली जाणार असली तरी चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते आॅक्टोबर या कालावधीत ज्या मिळकतधारकांनी आॅनलाइनद्वारे घरपट्टी व पाणीपट्टीचा भरणा केला असेल त्यांनाही ही सवलत योजना लागू राहणार आहे. सदर सवलतीची रक्कम ही सन २०१७ - १८ या आर्थिक वर्षात येणाऱ्या बिलात समायोजित केली जाणार आहे. याशिवाय महापालिकेने आॅनलाइनद्वारे नेट बॅँकिंग, डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. महापालिकेला एका बिलासाठी सुमारे ६५ रुपये खर्च येतो. आॅनलाइन करभरणा झाल्यास महापालिकेचा या बिलावरील खर्च वाचणार आहे तसेच मनुष्यबळावरील ताणही कमी होणार आहे. पुढील वर्षापासून मिळकतधारकांनी जास्तीत जास्त आॅनलाइन पोर्टलचा कर भरण्यासाठी उपयोग करावा यासाठी अधिक प्रयत्न केले जाणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले. (प्रतिनिधी)