कांद्याच्या भावातील घसरणीमुळे चिंता
By Admin | Updated: September 22, 2016 22:59 IST2016-09-22T22:59:11+5:302016-09-22T22:59:27+5:30
कांद्याच्या भावातील घसरणीमुळे चिंता

कांद्याच्या भावातील घसरणीमुळे चिंता
वणी : कांद्याच्या दरातील घसरणीमुळे कांदा उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, परतीच्या पावसामुळे कांदा साठवण करणे शक्य नसल्याने उत्पादक काळजीत पडले आहेत. वणीच्या उपबाजारात आज तीनशे वाहनांमधून उत्पादकांनी कांदे विक्रीसाठी आणले होते.
कळवण, चांदवड, देवळा व दिंडोरी भागातील शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या कांद्यास अपेक्षित दर मिळाले नाहीत. सरासरी २५० रुपये क्विंटल दराने व्यवहार पार पडले. मागे व्यापारीवर्गाच्या संपामुळे कांदा चाळीत ठेवावा लागला होता. तेव्हा काही ठिकाणी पावसामुळे कांदा विक्री स्थितीत राहिला नव्हता, अशा स्थितीत काही उत्पादकांनी पोटच्या मुलाप्रमाणे कांद्याची निगा ठेवली होती. दरम्यान, त्याही कांद्याला समाधानकारक दर मिळाला नव्हता व दरातील घसरण सुरूच राहिली. दरम्यान, कांदा खरेदीदार देशांतर्गत मागणी वाढली तरच कांदा खरेदीस अनुकूलता दर्शवितात. कारण सद्य-स्थितीत शेतकरीवर्गाला कांदा चाळीत ठेवणे धोक्याचे आहे. तीच स्थिती व्यापारीवर्गाची आहे. कारण गुदामात कांदे साठविले व पावसाचा जोर वाढला तर कांदे फेकावे लागतील व तो खर्च सोसण्याची तयारी व्यापारीवर्गाला ठेवावी लागेल. ते आर्थिकदृष्ट्या परवडणारी नसल्याची व्यापाऱ्यांची भावना आहे. (वार्ताहर)