‘लय भारी’वर कॉम्बोची सक्ती
By Admin | Updated: July 18, 2014 00:34 IST2014-07-17T23:24:57+5:302014-07-18T00:34:08+5:30
‘लय भारी’वर कॉम्बोची सक्ती

‘लय भारी’वर कॉम्बोची सक्ती
नाशिक : नाशिक : ‘लय भारी’ या मराठी टॅक्स फ्री चित्रपटाच्या तिकिटासोबत प्रेक्षकांना सक्तीच्या कॉम्बो पॅकची रक्कम आकारली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मनविसेसह कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडत हा संपूर्ण प्रकार हाणून पाडला आहे. तसेच पुन्हा अशाप्रकारे प्रेक्षकांची लूट केल्यास तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा दिला आहे.
गेल्या शुक्रवारपासून शहरातील सिनेमॅक्स व बिगबाजार चित्रपटगृहात ‘लय भारी’ हा मराठी चित्रपट दाखविण्यात येत असून, चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचाच विचार करून चित्रपटगृह चालकांनी तिकिटासोबतच कॉम्बो पॅकची सक्ती केल्याने प्रेक्षकांना ७० रुपयांच्या तिकिटासाठी तब्बल १५० रुपये मोजावे लागत आहेत. त्यातच आज अंगारकी संकष्टी चतुर्थी असल्याने बहुतेक प्रेक्षकांचे उपवास होते. त्यामुळे त्यांनी कॉम्बो पॅक घेण्यास नकार दिला. मात्र चित्रपटगृह प्रशासनाने कॉम्बो पॅक घ्या अन्यथा तिकीट दिले जाणार नसल्याची भूमिका घेतल्याने उपस्थित प्रेक्षकांनी पैसे परत द्या अशी मागणी केली. मात्र तरीदेखील चित्रपटगृह प्रशासन आडमुठे धोरण घेत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेसह कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहावर जाऊन हा सर्व प्रकार थांबविला.यावेळी चित्रपटगृह प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांना तिकिटाबरोबर कॉम्बो पॅकचा दर लावू नये अशा सूचना दिल्या. यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य गिते, मुकेश शहाणे, जय कोतवाल, राकेश परदेशी, संजय देवरे, तुषार मटाले, समाधान दातीर, तर कॉँग्रेसचे दर्शन पाटील, राहुल हिरे, भूषण काळे, विशाल मटाले, अक्षय कलंत्री आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)