‘नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद
By Admin | Updated: February 23, 2015 00:31 IST2015-02-23T00:04:09+5:302015-02-23T00:31:17+5:30
बंद शांततेत : सुमारे शंभर आंदोलनकर्ते ताब्यात; दुपारनंतर सर्व दुकाने सुरू

‘नाशिक बंद’ला संमिश्र प्रतिसाद
नाशिक : महाराष्ट्राच्या डाव्या व पुरोगामी चळवळीतील नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी डाव्या पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला़ रविवारी सकाळी शालिमार परिसरात दुकाने बंद करण्यास गेलेले पक्षांचे नेते व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली़ भारत-दक्षिण आफ्रिका क्रिकेट सामना व सुटीचा दिवस यामुळे या बंदचा विशेष परिणाम जाणवला नाही़ दुपारनंतर नेहमीप्रमाणे शहरातील सर्व दुकाने नियमितपणे सुरू होते़
कॉ़ गोविंद पानसरे यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ डाव्या पक्षांनी रविवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता़ सकाळी दहा वाजेच्या सुमारास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डॉ़ डी़ एल़ कराड, अॅड़ तानाजी जायभावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष अर्जुन टिळे, काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष वत्सला खैरे, वंदना मनचंदा, हेमलता पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे अॅड़़ मनीष बस्ते, डॉ़ संजय जाधव यांनी शिवाजी रोड, शालिमार, नेपाळी कॉर्नर या परिसरातील दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते़
पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना शालिमार येथे अडविल्यानंतर त्यांनी रस्त्यावर ठाण मांडून बसण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांना पोलिसांनी बळजबरीने ताब्यात घेऊन गाडीत बसविले़ शालिमारजवळ सुमारे पन्नास कार्यकर्ते, सिटी सेंटर मॉल येथे सुमारे पंधरा तर शहरातील इतर भाग मिळून सुमारे शंभर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले़ या ताब्यात घेतलेल्या कार्यकर्ते व नेत्यांपैकी काहींना सरकारवाडा, आडगाव येथील पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते़
डाव्या आघाडीने पुकारलेल्या या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शहरातील मुख्य बाजारपेठ असलेले शालिमार, मेनरोड, शिवाजी रोड या ठिकाणी पोलीस उपायुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने तैनात करण्यात आला होता़ पोलिसांनी आंदोलनातील नेते व सहभागी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले़ यानंतर त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले़
सकाळच्या सुमारास सुरू असलेली भारत-दक्षिण अफ्रिका क्रिकेट सामान्यामुळे बहुतांशी नागरिकांनी घरी बसून हा सामना पाहण्यास पसंती दिली़ तसेच दुपारी बारा वाजेनंतर तर शहरातील जवळपास सर्वच दुकाने उघडली होती़ या बंददरम्यान शहरात कुठेही अनुचित प्रकार झाला नसल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली़
सिडकोत अल्प प्रतिसाद
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी या मागणीसाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या पाश्वभूमीवर सिडकोतील दुकाने काही प्रमाणात बंद दिसल्याने बंदला अल्प प्रतिसाद जाणवला. महाराष्ट्र बंदच्या पाश्वभूमीवर सिडकोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दुकानदारांना बंदचे आवाहन करण्यात आले.
उंटवाडी सिटी सेंटर मॉल येथे मॉल बंद करीत असताना सरकारवाडा पोलिसांनी राष्ट्रवादीच्या युवक शहराध्यक्ष छबू नागरेसमवेत सिडको विभाग अध्यक्ष अमोल नाईक, मुकेश शेवाळे, कुणाल बागडे, प्रवीण घोटेकर, सिद्धांत काळे, रोहित श्ािंदे, सनी इकबाल, सुमित अहिरे, धनंजय भावसार आदिंना ताब्यात घेतले.
नाशिकरोडला निवेदन गोविंद पानसरे यांच्या हत्त्येच्या निषेधार्थ पीपल्स रिपाइं पक्षातर्फे नाशिकरोड पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन निवेदन सादर करण्यात आले. पक्षाचे नेते शशिकांत उन्हवणे यांनी पोलीस उपआयुक्त निसार शेख यांना निवेदन सादर केले. पानसरे यांच्या मारेकऱ्यांना त्वरित अटक करावी व त्यांना कडक शासन करावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
सातपूर बंदला अत्यल्प प्रतिसाद
ज्येष्ठ कामगार नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याच्या निषेधार्थ भाकप, तसेच डाव्या संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सातपूर परिसरात अत्यल्प प्रतिसाद लाभला. औद्योगिक क्षेत्रावर या बंदचा काहीही परिणाम झाला नाही.