जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

By Admin | Updated: March 23, 2015 23:34 IST2015-03-23T23:33:16+5:302015-03-23T23:34:46+5:30

प्रतीक्षा मदतीची : सर्वाधिक नुकसान बागलाणमध्ये

Complete the panchnama of 22 thousand hectares in the district | जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण

जिल्ह्यात २२ हजार हेक्टरवरील पंचनामे पूर्ण


 नाशिक : दोन आठवड्यांपूर्वी सलग चार दिवस जिल्ह्यांत हजेरी लावणारा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या २२ हजारांहून अधिक हेक्टर पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असून, त्यात कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. पंचनामे पूर्ण झाल्याने आता शेतकऱ्यांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.
दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे पंचनामे करणाऱ्या तलाठी, मंडळ अधिकारी व कृषी सहायकांना प्रचंड धावपळ करावी लागली. एकीकडे दररोज कोसळणारा पाऊस, तर दुसरीकडे शासनाचा पंचनामे तत्काळ करण्याच्या फतव्यामुळे यंत्रणेवर प्रचंड दबाव निर्माण झाला होता. एकाच शेतात दररोज कमी अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे वारंवार पंचनामे करण्याची, तर काही शेतामधील पूर्ण पीकच नष्ट झाल्याने पंचनामे तरी काय करणार, असा प्रश्न पडत होता. अशाही परिस्थितीत चार दिवस सलग पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पंचनामे करताना ते थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन करण्यात यावेत, तसेच नुकसान झालेल्या पिकांचे छायाचित्र अथवा ध्वनिचित्रफीत काढण्यात यावी, त्याचबरोबर पंचनाम्यावर शेतमालकाची स्वाक्षरी घेण्याचेही बंधनकारक केल्याने पंचनामे करण्यासाठी यंत्रणेला दहा दिवसांचा कालावधी लागला. 
त्यात जिल्ह्णातील बारा तालुक्यांतील ३८६ पैकी ३३७ गावांमधील ४५ हजार २०३ शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून, त्यात २२ हजार ७४० हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाने बाधा पोहोचली आहे.
जिल्ह्णात सर्वाधिक पिकाचे नुकसान बागलाण तालुक्यात झाले असून, २२ गावांपैकी एकाच गावातील ३३७१ शेतकऱ्यांचे पंचनामे केले असता, २९०७ हेक्टरवरील पिके बाधित झाल्याचे स्पष्ट झाले. अन्य २१ गावांचे पंचनामे अद्याप शिल्लक असल्याने या तालुक्याचे नुकसान वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. सर्वात कमी नुकसान कळवण तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील २६ गावांना अवकाळी पावसाने फटका बसला; परंतु २१६ शेतकऱ्यांच्या फक्त ८२ हेक्टर पिकावरच त्याचा परिणाम झाला आहे.

Web Title: Complete the panchnama of 22 thousand hectares in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.