संपूर्ण एलबीटी रद्द व्हावा
By Admin | Updated: August 1, 2015 23:34 IST2015-08-01T23:33:19+5:302015-08-01T23:34:08+5:30
शंतनू भडकमकर : ‘चेंबर आॅफ कॉमर्स’चा उत्तर महाराष्ट्रात दौरा

संपूर्ण एलबीटी रद्द व्हावा
नाशिक : राज्य शासनाने पन्नास कोटींपर्यंत उलाढाल असणाऱ्या उद्योगांचा एलबीटी रद्द करीत चांगले पाऊल उचलले आहे; मात्र उद्योजकांचा जकात व एलबीटी अशा दोन्ही करप्रकारांना विरोध असून, चेंबर आॅफ कॉमर्सच्या वतीने संपूर्ण एलबीटी रद्द व्हावा, यासाठी पाठपुरावा केला जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी दिली.
अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर भडकमकर यांनी चेंबरच्या ‘उद्योजकतेचा जागर’ या उपक्रमाअंतर्गत नुकताच उत्तर महाराष्ट्राचा दौरा पूर्ण केला. त्यानंतर नाशकात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या दौऱ्यात जळगाव, धुळे, कळवण, सटाणा, मालेगाव, अभोणा यांसह अनेक गावांना भेटी देण्यात आल्या. तेथील उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. व्यापारी मेळावे घेण्यात आले, महाविद्यालये-शाळांना भेटी देऊन उद्योजकतेविषयी प्रबोधन करण्यात आले. या भागात कौशल्य विकासाला मोठा वाव असून, शेजारच्या राज्यांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी तेथील उद्योजकांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत टप्प्याटप्प्याने उर्वरित महाराष्ट्राचा दौरा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. चेंबर आॅफ कॉमर्सने शिक्षण क्षेत्रासाठीही पुढाकार घेतला असून, महाविद्यालयीन शिक्षणातून उद्योजकतेचे धडे मिळावे, यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे भडकमकर म्हणाले. शेतकऱ्यांना अन्य सवलती देण्यापेक्षा सौरऊर्जा पंप द्यावेत, असे मतही यावेळी मांडण्यात आले.
दरम्यान, शासनाने पन्नास कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या उद्योगांना एलबीटीत सवलत दिली असली, तरी नाशिकमध्ये या कक्षेबाहेरचे उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. शासनाच्या या निर्णयाचा फटका नाशिकमधील उद्योगांना बसत असून, संपूर्ण एलबीटी रद्द करण्यासाठी गरज पडल्यास आंदोलनही पुकारले जाईल, असा इशारा यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी दिला.