कुंभमेळ्याची कामे मार्चपर्यंत पूर्ण करा
By Admin | Updated: July 12, 2014 00:24 IST2014-07-12T00:00:11+5:302014-07-12T00:24:01+5:30
कुंभमेळ्याची कामे मार्चपर्यंत पूर्ण करा

कुंभमेळ्याची कामे मार्चपर्यंत पूर्ण करा
नाशिकरोड : कुंभमेळ्याची कामे मार्गी लावतांना सर्व विभाग एकमेकांशी समन्वय साधून मार्च २०१५ पर्यंत कामे पूर्ण करतील. तसेच दर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेण्यात येईल,अशी माहिती नगरविकास विभागाचे श्रीकांत सिंग यांनी दिली.
विभागीय आयुक्त कार्यालयात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध खात्यांची कुठली कामे सुरू आहे, कुठल्या टप्प्यावर आहेत, अडचणी काय आदि माहिती नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंग, जलसंपदा विभागाच्या सचिव मालिनी शंकर यांनी घेतली.
बैठकीबाबत माहिती देतांना नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंग यांनी सांगितले की, आतापर्यंत कुंभमेळ्याच्या कामांचे नियोजन सुरू होते. मात्र आता प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली असून मार्च २०१५ अखेर सर्व कामे पूर्ण करावयाची आहेत. त्यामुळे ठराविक मुदतीनंतर सुरू असलेले काम त्या टप्यापर्यंत झाले आहे की नाही याचा आढावा घेण्यासाठी दर मंगळवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे. समन्वयाच्या अभावामुळे कुठल्याही कामाला उशीर होऊ नये यासाठी दर आठवड्याला बैठक घेणार आहे.
कुंभमेळ्यासाठी वीज वितरण कंपनीला ट्रान्सफार्मर व तपोवनात उपकेंद्र उभारण्यासाठी जागा पाहिजे होती. वीज वितरण कंपनीने मनपाकडे जागेची मागणी केली होती. मात्र मनपाने महावितरणकडे पैशाची मागणी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. मात्र मनपा व महावितरण मधील वाद मिळवून जागा उपलब्ध करून दिल्याचे सिंग यांनी सांगितले.
कुंभमेळ्यात मुंबई अग्निशामक दलाची मदत घेण्यात येणार आहे. तसेच एसटी महामंडळाव्यतिरिक्त जादा बसेस लागल्यास मुंबई, पुणे आदि मनपाच्या बसेस मागविल्या जातील. कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसवू शकलो नाही तर पोलीस प्रशासनाकडून तात्पुरत्या स्वरूपात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा १५ कोटीचा आराखडा तयार असल्याचे सिंग यांनी सांगितले. कुंभमेळ्यात शहराबाहेर खाजगी वाहने थांबविण्यात येणार आहेत. त्यामुळे तेथुन बसेस कशा, किती वेळात सुटतील, कुठपर्यंत जातील यांचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्हा रूग्णालयात २०० खाटा वाढविण्यात येत असून खाजगी रूग्णालयाची मदत घेण्यात येणार आहे. तसेच शहराबाहेरील वाहनतळावर अत्याधुनिक मोबाईल अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सिंग यांनी सांगितले. गर्दी झाल्यास चेंगराचेंगरी होऊ नये याची विशेष खबरदारी घेत रांगेतील भाविकांना तत्काळ इतर मोकळ्या जागी हलविण्याच्या उपाययोजना केल्या जात आहेत.सिंग यांनी साधुग्रामसह विविध खात्यामार्फत सुरू असलेल्या ९५ कामांचा आढावा घेतला. बैठकीला विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, मनपा प्रभारी आयुक्त डॉ. संजीवकुमार, शहर अभियंता सुनील खुने आदिंसह संबंधित विभागाचे अधिकारी, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)